ज्यांनी इतिहास घडवला नाही तेच इतिहास पुसतायत

 

राज्यात आघाडीची साकार स्थापन झाल्यापासून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे सामना अग्रलेखातून भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. त्यातच आता ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ या संस्थेने ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या पोस्टरवरून पंडित नेहरुंचे चित्र वगळले.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना रोखठोकमधून केंद्र सरकार पर्यायाने मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. इतिहास पुसणे हे शौर्य नाही, असा शाब्दिक वार करताना, ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहासाचे संदर्भ पुसण्यातच धन्यता मानतात, ही जगभराची ‘रीत’ आहे, असा टोमणाही सामना रोखठोकमधून लगावण्यात आला आहे.ICHR ने पंडित नेहरुंचं चित्र वगळलं, राऊत भडकले, ‘ज्यांना इतिहास घडवता नाही ती माणसं इतिहास पुसतात’

राहुल गांधी, प्रियंका, सोनियांशी मोदी सरकार, भाजपचं भांडण असू शकेल, पण पंडित नेहरुंशी वैर का? नेहरुंनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकूनच आज सरकार अर्थचक्राला गती देत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील नेहरुंचं स्थान अढळ आहे. तो इतिहास पुसणे हे शौर्य नाही, अशा शब्दात राऊतांनी निशाणा साधलाय.

भारतीय स्वातंत्र्याचे सध्या ७५ वे म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. भारतात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ या संस्थेने ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या पोस्टरवरून पंडित नेहरुंचे चित्र वगळले. या पोस्टरवर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची छायाचित्रे ठळकपणे आहेत, पण पंडित जवाहरलाल नेहरु व मौलाना अबुल कलाम आझाद यांना वगळण्यात आले.

नेहरु, आझादांना वगळून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, पण नेहरूंना खासकरून वगळून विद्यमान सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडविले. स्वातंत्र्य लढा हा आपला इतिहास आहे. इतिहास म्हणजे मनुष्याच्या प्रगतीची व दोषांची नोंद असते. इतिहास म्हणजे त्या त्या कालखंडातील त्या त्या लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व आर्थिक विचारांचे, आशा- आकांक्षांचे, घडामोडींचे आणि स्थितीचे प्रतिबिंब असते.

Team Global News Marathi: