कोण अजित पवार, भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्याचे दाखले मला काय देता : नारायण राणेंचा सवाल

कोण अजित पवार, भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्याचे दाखले मला काय देता : नारायण राणेंचा सवाल

कणकवली : राज्यात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भाजप आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव आवाज काढत उडवलेली खिल्ली चर्चेत आहे. यावरून मोठा वादही सुरू आहे. सभागृहात अजित पवारांनी नितेश राणे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तुम्ही मतदारांच्या पाठिंब्याने सभागृहात आहात, तुम्ही कुत्री, कोंबड्या आणि मांजरांचे प्रतिनधी नाही, असे अजित पवारांनी ठणकावले.

कोण अजित पवार? मी ओळखत नाही : राणे

यावर नारायण राणे यांनी अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, कोण अजित पवार? मी त्याला ओळखत नाही. जनतेच्या पैशांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असणाऱ्याचे दाखले तुम्ही मला काय देता?

आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का?

ते पुढे म्हणाले की, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नितेश राणे यांनी मांजराचा आवाज काढला असेल तर त्यामध्ये गैर काय होते? आदित्य ठाकरे यांना या गोष्टीचा राग का यावा? वाघाची मांजर कधी झाली. त्यांचा आवाज मांजरीसारखा आहे का? माझ्या मते आदित्य ठाकरे यांचा आवाज तसा नाही. आदित्य ठाकरे तिथून जात असताना एखादा वेगळा आवाज काढला असता तर मग लगेच त्यांना त्या प्राण्याची उपमा लागू होते का, असा सवालही नारायण राणे यांनी विचारला.

नितेश राणेंसाठी इतकी यंत्रणा कामाला लावली!

राणे पुढे म्हणाले की, सध्याच्या घडीला नितेश राणे विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट काम करणारा आमदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. सभागृहात नितेश राणे यांच्यासमोर येऊन बोलण्याची कोणाचीही ताकद नाही!” दरम्यान, संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे यांना पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले की, नितेश राणे हे काय अतिरेकी आहेत का? एका आमदारासाठी इतकी यंत्रणा कामाला कशी लावली जाते? एखाद्याला फक्त मारहाण झाली किंवा खरचटलं असताना एवढी पोलीस यंत्रणा कामाला का लागली आहे? ३०७ कलम लावायला एखाद्याचा खून झाला आहे का? असेही ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: