देशमुख १५ फेब्रुवारीला कुठे होते ? ; फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत काल गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून पवारांच्या दाव्यांची पोलखोल केली होती. त्यामुळे फडणवीस आज काय मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ”आपण नेहमी मराठीत आणि हिंदीत बोलतो. पण, पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. त्यामुळे मी हिंदीत सुरुवातीला बोलेन त्यानंतर मराठीत बोलेन. पवारां इतकं माझं इंग्रजी चांगलं नाही. त्यामुळे मी हिंदीत बोलतो,” अशी सुरुवात करत फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेचा रोख काय असणार आहे हे सुरुवातीलाच स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांनी काही कागदपत्रे सादर करत अनिल देशमुख खासगी विमानाने नागपूरहून मुंबईला आले होते, असा दावा केला आहे. ”शरद पवार यांना काल चुकीची माहिती दिली होती. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली. अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न फसला आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ”गृहमंत्रालयांच्या कागदपत्रांपासून ते या दरम्यान कुठे कुठे गेले, याची माहिती मिळत आहे.

 

मात्र, ते गेले की नाही, याची माहिती नाही. १५ ते २७ फेब्रुवारी या तारखेदरम्यान अनिल देशमुख ‘होम आयसोलेशन’मध्ये नव्हते. त्यांना या काळात अनेक मंत्री, अधिकारी भेटले आहेत. अनिल देशमुख यांना या काळात कोण कोण भेटलं ही माहिती शोधून काढणे सहज शक्य आहे,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

”अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारी रोजी नागपूर ते मुंबई, असा विमान प्रवास केल्याचे एका कागदपत्रातून समोर येत आहे. देशमुख यांच्यासह आठ जणांनी हा प्रवास केला असून, त्यात पूजा देशमुख यांचाही समावेश आहे. एका खासगी विमानाने ते नागपूरहून मुंबईला आले. विशेष म्हणजे, अनिल देशमुख यांनीही मी, १५ फेब्रुवारीपासून २७ फेब्रुवारीपर्यंत ‘आयसोलेशन’मध्ये होतो, असे व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरपणे सांगितले आहे. मात्र, नागपूर ते मुंबई या विमानप्रवासाच्या कागदपत्रामुळे पुन्हा एकदा गृहमंत्री देशमुख अडचणीत आले आहेत.”

 

 

पुढे फडणवीस यांनी गृहमंत्रालयाच्या एका कार्यक्रम पत्रिकेचा हवाला देत ते म्हणाले, “१५ तारखेची गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका आहे. १५ तारखेला ते एका खासगी विमानाने आले होते. १५ तारखेला ते आपल्या घरी होते. पण, पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा माझ्याकडे एक कागद आहे. त्यात १७ फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतील. तर अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील. त्यानंतर २४ तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याची पोलिसांची माहिती आहे.

 

अर्थात, त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही,” असंही फडणवीस म्हणाले. पुढे, “शरद पवार हे एक राष्ट्रीय नेते आहे. त्यांना चुकीचं ‘ब्रिफिंग’ केले जात आहे. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली. देशमुखांना प्रोटेक्ट केले गेले आहे,” असेही फडणवीस म्हणाले.

 

पुढे फडणवीस यांनी, सरकार धोक्यात येईल म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन टॅपिंगच्या अहवालाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला. आपण आज दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार असल्याचे सांगितले. ही भेट राज्यातील बदल्यांच्या रॅकेटची माहितीदेखील देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी आपल्याकडे काही फोन रेकाॅर्ड असून तेदेखील गृह सचिवांसमोर सादर करणार असल्याचेही सांगितले. यावेळी या सर्व प्रकरणांची ‘सीबीआय’ चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही फडणवीस केंद्रीय गृहसचिवांकडे करणार आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: