विठुभेटीची ओढ येते कुठून?

विठुभेटीची ओढ येते कुठून?

वारीत प्रेम, बंधुभाव, समता,

राजकारण अन् विरोधाभासही

टाळ, मृदंगाचा गजर, एका लयीतलं सामूहिक भजन, कुठं उभं, तर कुठं गोल रिंगण, चोपदारांनी दंड वर केल्यावर एका सेंकदात शांत होणारा हजारोंचा जनसमुदाय… अगदी गावाकडची जत्राही न पाहिलेल्या माझ्यासारख्या मुंबईकर शहरी मुलीला हे सगळं आश्चर्यचकीत करणारं होतं. पत्रकार म्हणून सोहळ्याकडं तटस्थपणे पाहणारी मी हळुहळू त्या प्रवाहात कधी एकरूप होऊन गेले हे कळलंच नाही…

– हर्षदा परब

मी २००८मध्ये दोन दिवसांसाठी वारीत लावलेली हजेरी आणि त्यानंतर २०१० आणि २०११ मध्ये ‘सामना’ वर्तमानपत्रासाठी वारी कव्हर केल्यानंतर मनावरची इंप्रेशन्स बदलत गेली. पण एक प्रभाव कायम राहिला, तो म्हणजे विठ्ठलाच्या ओढीनं पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांबद्दलची उत्सुकता! कोण विठ्ठल, काय वारी याची मला २००८ मध्ये कल्पनाही नव्हती. देव म्हणजे गणपती, शंकर, विष्णू असे नेहमीचे ओळखीतले देव. पण विठ्ठल माहिती नव्हता, की वारी कशी असते याची कल्पना नव्हती.

शहरातली मुलगी असल्याने साधी जत्राही बघितली नव्हती. शहराच्या झगमगाटाची सवय होती. पण एवढ्या चालणाऱ्या गर्दीत कधीच गेले नव्हते. दुतर्फा हिरव्या झाडीमधून चालणाऱ्या दिंड्यांमधून प्रसन्न सकाळी ऐकू येणारा टाळ, मृदंगाचा गजर, लयीत ऐकू येणाऱ्या अभंगांनी मन शांत झालं. एकूण दोनदा मी सामना वर्तमानपत्रासाठी वारी कव्हर केली.

क्रमांकाच्या दिंड्या टापटिपीच्या…

वारी कव्हर करायला गेले तेव्हा कधी हॉटेल, तर कधी ओळखीच्या लोकांच्या घरी मुक्काम केला. तेव्हा वारकऱ्यांसारखं उघड्यावर राहणं अनुभवलं नाही. अगदी पहाटे दोन-तीन वाजता उठून आन्हीकं उरकून विना क्रमांकाच्या दिंडीतले वारकरी पहाटेच्या काळोखातच वाटचाल सुरू करतात. तेव्हा वाटायचं एवढ्या लवकर ही मंडळी वाटचाल का सुरू करत असावीत? नंतर लक्षात आलं, त्यांना पुढं जाऊन मुक्कामासाठी जागा पकडायची असते.
क्रमांकाच्या दिंड्या टापटिपीच्या. विनाक्रमांकाच्या दिंड्या त्यांच्यापुढं जरा गबाळ्या.

‘माऊली’ हा शब्द परवलीचा…

मी संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा कव्हर केला. त्यामुळं वारी कव्हर करण्याचा अनुभव या सोहळ्यापुरताच मर्यादीत आहे. वारीच्या वाटेवर ‘माऊली’ हा जसा प्रेमानं संबोधण्यासाठी तसा शब्द रागवण्यासाठी, बाजूला हो म्हणण्यासाठी किंवा काही विचारायचं असेल तर, त्यासाठीही सर्रास वापरतात हे मला तेव्हा फारच भारी वाटलं होतं. शहरात मुलं जस ‘हे ब्रो’ किंवा ‘भावा’ म्हणतात तसंच ते. ‘माऊली, अहो काय धक्का मारता’ असं म्हटलं जातं. ‘माऊली’ हा शब्द वारीच्या काळात सर्वाधिक वापरला जाणारा शब्द असतो.

बायका-पुरुषांच्या अंघोळी शेजारी शेजारी…

पहिल्यांदा वारीला गेले तेव्हा सकाळी नदीत शेजारी शेजारी अंघोळ करणाऱ्या बायका आणि पुरुष बघून थोडं आश्चर्य वाटलं. इथं स्त्री-पुरुष भेद नाही, या विचारानं भारीच वाटलं. असं असलं तरी दिंड्यांमध्ये वीणेकरी पुरुषच दिसतात. तुळस पुरुषांच्या नाही, तर बाईच्याच डोक्यावर असते. बायका दिंडीत मागेच चालतात, हे पाहून मन खट्टू झालं. पण नदीतली अंघोळ असो, की उघड्यावर बाथरूमला जाणं, वेगळी अशी पुरुषी नजर पाहायला मिळाली नाही, हे मला फार आश्चर्याचं आणि भारी वाटलं.

भेदाभेद भ्रम अमंगळ?

२०१०च्या वारीत जैतुनबी यांना भेटण्याचा योग आला. त्यांच्याबद्दल बरंच ऐकलं आणि वाचलं होतं. तेव्हा पहिल्यांदा वाटलं जैतुनबी म्हणजे मुस्लीम मग त्या वारीत कशा? पण त्यांना समाजात असलेला आदर पाहून मी फारच इंप्रेस झाले. जैतुनबी स्वतः दिंडी चालवायच्या, कीर्तन करायच्या. त्यामुळे वारी महिलांना आणि सर्व जाती, धर्माच्या लोकांना सामावून घेते हे पाहून थोर वाटलं. त्याच वेळी संत ज्ञानेश्वर माऊलींसाठी नैवेद्य करणारी आणि भांडी घासणारी महिला ‘वेगळी’ असते हे पाहून आश्चर्यही वाटलं.

मी २०१२मध्ये जेव्हा वारी कव्हर केली, तेव्हा दोन बहिणी माऊलींसाठी नैवेद्याचं जेवण करायच्या. त्या सोवळ्यात वावरायच्या, सोवळ्यात जेवण बनवायच्या. त्यांना मानही होता. पण भांडी घासायला एक सावळी, डोक्यावरुन पदर घेतलेली, काष्ट्याची साडी नेसलेली महिला होती. आपल्याला माऊलींचं काम करायला मिळतंय यावरच समाधान मानणारी. त्या महिलेच्या बातम्याही बऱ्याच झाल्या. मी जेव्हा त्यांच्याशी बोलले, त्यानंतर कोणी तरी मला त्यांची जातही सांगितली. ‘भेदा भेद भ्रम अमंगळ’ मानणाऱ्या संतांच्या वारीत असाही भेद असतो, हे पाहून मला आश्चर्य वाटलं.

इतर पालखी सोहळे तुलनेने साधे…

संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा श्रीमंत. त्यामुळं सोहळ्यात बऱ्याच सुविधा असतात. सरकारी यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा सज्ज असते. पण इतर पालखी सोहळ्यांसाठी तितकासा जामानिमा नसतो किंवा तिथल्या बातम्याही होत नाहीत, हे दुसऱ्यांदा वारी कव्हर करायला गेले, तेव्हा लक्षात आलं.

वारीत अनेकदा एखाद्या मोठ्या दिंडीत जेवण्याची संधी मिळते. पत्रकार प्रेस कॉन्फरन्ससाठी जातात तिथे त्यांच्यासाठी जेवण असतं, तसं हे जेवण नसतं. वारीत ओळखीच्या महाराजांनी, वारकऱ्यानं प्रेमानं जेवायला बोलावलं तर जायचं असतं. असंच एका दिंडीत जेवलो. वारीत नुस्त्या भाकरी पिठल्यालापण चव असते. शिवाय तेही रस्त्यावर वगैरे. म्हणजे हायजिन वगैरे काही डोक्यात आणायचं नाही.

अशाच एका वारीत एक मुलगी दिसली. पुण्यातल्या एका दिंडीबरोबर आलेली. ही दिंडी नेहमीच्या वारकऱ्यांव्यतिरिक्त सामान्यांसाठीही दिंडी काढते. ज्यात बरेच ‘कॉर्पोरेट कॉलरवाले’ असतात. त्यातलीच ही मुलगी होती. माणूस आतून हलणं म्हणजे काय हे मी त्या मुलीला पाहून अनुभवलं. एकदम शांत होती ती. प्रचंड भेदरलेली आणि एक रिकामेपण तिच्या डोळ्यात दिसत होतं. तिच्याशी झालेलं बोलणं नाही आठवत. पण तिला वारीत चालून समाधान मिळतंय, असं तिने सांगितलं होतं.

वारीच्या वाटेवर कादंबरी…

याच वारीच्या वाटेवर एक बंडखोर लेखक, कवी भेटला. दशरथ यादव. ‘विठ्ठलाशी एक बोलायला हवं’ म्हणणारा. वारीतल्या रुढी,परंपरांना थोतांड म्हणणारा. लावणीवर आत्मियतेनं आणि अभ्यासू पद्धतीनं बोलणारा हा बंडखोर पत्रकार वारीतल्या बातम्या तितक्याच कसदारपणं लिहायचा. दशरथ यादवांचं वारीच्या वाटेवर नावाची कादंबरीही आलीय काही वर्षांपूर्वी.

२०११ च्या वारीत बहुदा मी जेव्हा पुन्हा ‘सामना’साठी वारी कव्हर करायला गेले. तेव्हा उद्धव ठाकरे वारीची फोटोग्राफी करायला आले होते. अर्थात त्यांना मी ‘सामना’साठी वारी कव्हर करतेय असं काही एक माहिती नव्हतं. पण त्यांनी काढलेल्या दोन फोटोंत मी दिसतेय. एक गाडीवरच्या टपावर आणि एका गोल रिंगणाच्या फोटोत. असो… पण असाही एक वेगळा अनुभव वारीने दिला.

वारीत चोऱ्या वगैरे होतात, वेश्याव्यवसायही चालतो, असं बोलणारेही ऐकले. जशा जैतुनबी भेटल्या तसंच रुढी, परंपरांचं अवडंबर सांगणारे ह. भ. प. भेटले. वारकऱ्यांतील राजकारणाचीही ओळख झाली. दिंडीचंही अर्थकारण असतं हे समजलं. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र अजूनही समजलेली नाही. ती म्हणजे वारकऱ्यांच्या मनात विठ्ठलाच्या भेटीची अनावर ओढ कशी काय निर्माण होते?

(लेखिका ‘मुंबई तक’ या वृत्तवाहिनीत पत्रकार आहेत.)

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: