जेंव्हा राज्यपाल राहिलेले खासदार हातात विळा घेऊन शेतात गहू काढतात तेंव्हा.. वाचा सविस्तर-

ग्लोबल न्यूज: सिक्कीम चे माजी राज्यपाल, माजी सनदी अधिकारी तथा साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी विकेंड लॉकडाऊन च्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत त्यांच्या कराड तालुक्यात असलेल्या शेतात चक्क स्वतः हातात विळा घेऊन खपली गहू काढलं काळ्या आईची सेवा केली आहे. या वयात ही त्यांनी टी शर्ट घालून प्रत्यक्ष शेतात काम करून शेतकऱ्यांना ही एक चागला संदेश दिला आहे.

सोशल मीडियावर या कामाचे फोटो शेअर करत त्यांनी म्हटले आहे की,दिवाळीनंतर लावलेला खपली गव्हाच्या कापणीला आला होताच. सप्ताहांताच्या दिवशीचा लॉकडाऊन असल्याने गोटे, कराड येथील संपर्क कार्यालय बंद होते. मोकळा वेळही मिळाला.

हातात विळा घेऊन तयार झालेला खपली गहू कापून घेतला आणि हा वेळ सत्कारणी लावला. मध्यंतरी दोन अवकाळी पाऊस झाले त्यामुळे अनेकांच्या पिकाचे बरेच नुकसान झाले.

आता हाताशी आलेल्या खपली गव्हाचे पुन्हा एखाद्या अचानक येणाऱ्या वळीव पावसात नुकसान होण्या आधी कापून घेण्यासाठी संधी मिळाली.

शेतकरी शेतात अपार कष्ट करतो, पिकाला जीवापाड जपतो पण तरीही तो निसर्गाच्या कृपेवरच अवलंबून असतो. जोपर्यंत सर्व संकटातून पीक सुखरूप घरात पोहोचत नाही तोपर्यंत काहीच खरं नसतं. म्हणूनच पीकाचं सगळं वेळापत्रक सांभाळून पिकाची आणि जमिनीची देखील निगा घ्यावी लागते, तेंव्हाच ही काळी आई शेतकऱ्यांना भरभरुन देते.

गव्हाची कापणी करीत असताना काळ्या आईचे हे ॠण मनोमन स्मरण करीत नतमस्तक झालो.

कोण आहेत श्रीनिवास पाटील?

सातारा जिल्ह्यातीलच पाटण तालुक्यातील मारुल हवेली हे श्रीनिवास पाटील यांचं मूळ गाव. 11 फेब्रुवारी 1941 साली शेतकरी कुटुंबात जन्मलेले पाटील हे लहानपणापासूनच लहान-मोठ्या माणसांत मिसळत होते. कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहवास पाटील यांना लाभला. शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर पाटील यांना यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ यांचे मार्गदर्शन मिळाले आणि पुढे जिल्हाधिकारी म्हणून निवडले गेले.

दुसरीकडे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हा शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना राजकारणात आणले. काँग्रेसचे तत्कालीन खासदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात पवार यांनी पाटील यांना कराड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. पहिल्यापासूनच कराड हा चव्हाण कुटुंबीयांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण, आई प्रेमिला चव्हाण यांनीही या मतदारसंघातून विजयी निवडणुका लढविल्या होत्या. त्यामुळे पृथ्वीराज यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांचा निभाव लागेल का? अशी त्यावेळची परिस्थिती होती. मात्र, जिल्हाधिकारी झाल्यानंतरचा अनुभव आणि लहानपणापासून लोकांमध्ये सहज मिसळण्याची खुबी पाटील यांच्याकडे असल्याने रांगड्या भाषणांद्वारे त्यांनी लोकांना आपलेसे केले. याच्या जोरावरच त्यांनी लोकसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला आणि ते खासदार झाले.

श्रीनिवास पाटील यांची बलस्थाने

साधी राहणी, रांगड्या बोलीतील भाषणे, गावोगावच्या जत्रा आणि कुस्तीची मैदाने आणि पंगतीला बसून कार्यकर्त्यांच्या पत्रावळीमध्ये जेवण करण्यामुळे ते लोकांना आपल्या घरातील व्यक्ती असल्यासारखे वाटत. 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात पाटील यांनी खासदारपद भूषविले होते. त्यानंतर श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपाल होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: