काय व्हायचे ते होऊन जाऊदे, राज ठाकरे यांचे औरंगाबादमध्ये प्रक्षोभक विधान

काय व्हायचे ते होऊन जाऊदे, राज ठाकरे यांचे औरंगाबादमध्ये प्रक्षोभक विधान

मशिदींवरील भोंगे उतरवले पाहिजे या भूमिकेचा राज ठाकरेंकडून पुनरुच्चार

हा प्रश्न जर सुटत नसेल तर जे काय व्हायचे ते होऊन जाऊदे

हे करण्यासाठी दोन हात करायला मागे पुढे पाहू नका असे आदेशही राज ठाकरे यांनी यावेळी दिले.

Raj Thackeray: औरंगाबाद : आज औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पाडली. यावेळी राज ठाकरे यांनी  मशिदींवरील भोंगे उतरवले पाहिजे या भूमिकेचा पुनरुच्चार केला. तसेच हा प्रश्न जर सुटत नसेल तर जे काय व्हायचे ते होऊन जाऊदे असे प्रक्षोभक विधानही केले. या वेळी राज ठाकरे यांनी पुन्हा ३ तारखेपर्यंत भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला. तसेच हे करण्यासाठी दोन हात करायला मागे पुढे पाहू नका असे आदेशही राज ठाकरे यांनी यावेळी दिले.

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतरच महाराष्ट्रात जाती जातींमध्ये विद्वेष निर्माण केला. बाबासाहेब पुरंदरे हे केवळ ब्राह्मण समाजाचे होते म्हणून शरद पवार यांनी त्रास दिला. शरद पवार यांना हिंदू शब्दाशी ऍलर्जी आहे, ते कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही, इतकेच नाही तर पवार हे नास्तिक आहे अशी माहिती खुद्द सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत दिली आहे असेही राज ठाकरे म्हणाले.

औरंगाबादमध्ये ६०० हून अधिक मशीद आहेत, औरंगाबमध्ये बांग देण्याचा कॉन्सर्ट असतो का अशी टीका राज ठाकरे यांनी केली. तसेच मशीदींवरी भोंग्यांचा विषय मी पहिल्यांदा काढलेला नाही. उत्तर प्रदेशमध्ये जर मशीदींवरील भोंगे उतरू शकतात तर आपल्या महाराष्ट्रात हे का होऊ शकत नाही असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. रस्त्यावर नमाज पठण करण्याची परवानगी मुस्लिम समाजाला कोणी दिली? आज एक तारीख आहे तीन तारेखेपर्यंत हे भोंगे उतरवले नाही तर मशीदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले.

सभे दरम्यान अझान सुरू झाली तेव्हा राज ठाकरे यांनी पोलिसांना विनंती करून ही अझान बंद करण्याची विनंती केली. तसेच अझान म्हणणार्‍यांच्या तोंडात बोळा घालावा. हे जर असेच ऐकत नसतील तर जे काय व्हायचे ते होऊन जाऊदे असे प्रक्षोभक विधान राज ठाकरे यांनी केले. तसेच ही अझान आता बंद झाली नाही तर त्यानंतर काय होईल त्यासाठी आपण जबाबदार नसल्याचेही राज ठाकरे म्हणाले.

आपण कुठल्याही धर्माविरोधात नाही. लाऊडस्पीकरचा हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे, जर या विषयाला तुम्ही धार्मिक वळण देणार असाल तर आम्ही यावर धार्मिक पद्धतीनेच उत्तर देऊन असा निर्वाणीचा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. मशीदींवरील भोंग्यांचा त्रास हा फक्त हिंदूच नव्हे तर मुस्लिमांनाही होतो असेही राज ठाकरे म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: