” बरबटलेल्या हातांनी चौकशी काय करणार? राज्य सहकारी बँकेची अर्धवट चौकशी पुन्हा सुरू करा”

 

सध्या महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोपहोत असताना आता भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेच्या चौकशीची चर्चा होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रवीण दरेकर यांनी आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच, पुणे जिल्हा सहकारी बँक आणि राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेवर देखील घोटाळ्याचे आरोप त्यांनी केले आहेत.

“बरबटलेल्या हातांनी चौकशी काय करणार? राज्य सहकारी बँकेची अर्धवट चौकशी पुन्हा सुरू करा. मी पत्र देणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाघोटाळा आहे. त्यांची खरेदी बघा. १५-२० कोटींचं सॉफ्टवेअर १५० कोटींना घेतलंय. राज्यातल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँका आणि सहकारी संस्थांची रीतसर तक्रार आम्ही करणार आणि घोटाळ्याच्या महाराष्ट्रातल्या महामेरूंना उघड करणार. प्रविण दरेकरचा एककलमी कार्यक्रम आता सहकारातले घोटाळे बाहेर काढणं हा आहे”, असं दरेकर यावेळी म्हणाले.

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या मुंबै बँक कथित अनियमिततेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश सहकार विभागाने दिले आहेत. यासाठी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या ३ महिन्यांत हा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे

Team Global News Marathi: