जाणून घ्या ; कुलदैवत म्हणजे नेमकं काय ? कसे ओळखाल आपले कुलदैवत ?

कुळ म्हणजे पूर्वीच्या काळी कोणा एका मूळ पुरुषाने निर्माण केलेले आणि एकमेकांशी रक्ताच्या नात्याने बांधलेले परंतु कालौघात विभक्त झालेले अनेक कुटुंबं. आप्त संबंधामुळे जे एकत्र येतात अशा एका रक्ताच्या नातेसंबंधाच्या लोकसमूहास समूहास कुळ म्हणतात. कुळ शब्दाला घराणं असे ही म्हंटले जाते.

प्रत्येक घराण्याचे स्वतःचे असे एक आराध्य दैवत असते. त्यांनाच आपण त्या घरण्याचे म्हणजेच कुळाचे दैवत म्हणतो. जेंव्हा आपल्या घरामध्ये कोणतेही मंगलकार्य जसे की, लग्न, वास्तू पूजन इ. असते, ते यथासांग पार पडल्यानंतर आपल्या कुलाच्या आराध्य देवतेच्या दर्शनास जाऊन त्यांचा शुभाशीर्वाद घेणे हे महत्वाचे असते.

आपल्या घराण्याचे कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय ? आपले कुलदैवत कुठले? त्याचे महत्व काय ? कुळाचार म्हणजे नेमके काय ? कुलदैवता संबंधी आपले कर्तव्य काय आहे ?

आजकाल आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे प्रश्न पडतात. पण विचारणार कोणाला? कारण सध्याच्या या मॉडर्न काळात एकत्र कुटुंब पद्धती लोप पावून विभक्त कुटुंब पद्धती सर्रास अंगिकारल्यामुळे वरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपल्या घरामध्ये जुनी जाणती मंडळी कोणीच नसतात. मग अशा वेळी घरात एखादे धार्मिक कार्य करायचे ठरतेय किंवा एखादी समस्या अचानक उद्भवते आणि त्यावेळी समजते की आपल्याला आपल्या कुलदैवताची उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे . जेणेकरून हे मंगल कार्य निर्विघ्न पार पडेल अथवा आलेल्या समस्येचे निराकरण होईल. अशा प्रसंगी सगळ्यांची पंचाईत होते. आपली विघ्ने हरण्यासाठी आणि आपली सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून आपल्या कुलदैवताची उपासना करणे आवश्यक असते.

कुलदैवत : कुलदेवता शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी बनतो. कुळाची देवता तीच कुलदेवता. ज्या घराण्यात देव आपल्याला जन्माला घालतो. त्या घराण्याची मूळ देवता म्हणजेच आपली कुलदेवता. कुळदेव पुरुष असल्यास कुलदेव आणि स्त्री दैवत असल्यास कुलदेवी म्हणतात. या कुलदैवताची उपासना करण्यासाठी आपल्याला आपल्या घराण्याच्या कुलदैवताविषयी अचूक माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. कुलदेवता उपासनेने आपल्या समस्त चिंता, समस्या आणि अडचणींचे निवारण होऊन निश्चितच आपल्याला शुभफळे मिळतात.

कुलदेवता उपासना महत्व : अवघे ब्रह्माण्ड व्यापलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते. भगवान श्रीविष्णू, भगवान श्रीशिवशंकर आणि श्रीगणेशाची उपासना केल्यास ही तत्वे प्रबळ होतातच, पण या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे बळ कुलदेवतेच्या जप व नामस्मरणामधे असते. म्हणून कुलदेवतेचे नित्य नामस्मरण व उपासनेला महत्व आहे.

कुलदैवत माहिती नसल्यास उपाय : एखाद्याला स्वतःचे कुलदैवतच माहिती नसल्यास आणि त्यामुळे धर्मकार्यात बाधा येऊन खोळंबा होत असल्यास हिंदू धर्मशास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत ते म्हणजे…

मूळ स्वरुपातील मुख्य देवता : ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया.
श्रीविष्णूं अवतार स्वरूप देवता : नृसिंह, राम, कृष्ण
श्रीशिवशंकर अवतार स्वरुप देवता : काळभैरव, खंडोबा, मारुती

आदिमाया अवतार स्वरुप देवता – सरस्वती, श्रीलक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, कालीमाता.
गणांचे अधिपती श्रीगणेश हे पूजनेच्या आरंभातील दैवत.
देवांचे सेनापती : कार्तिकेय.

वैदिक देवता : अग्नी, सूर्य
उपरोक्त देवतांपैकी ज्या दैवतावर आपली मनोभावे श्रद्धा, भक्ती आहे त्यांची उपासना केल्यासही कुलदैवत उपासनेची शुभफळे प्राप्त होतात.

कुलदेव किंवा कुलदेवी हे आपल्या कुलाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असते. त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमीच राहण्यासाठी, आपली सर्वांगीण प्रगती होण्यासाठी, वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी, कुलदेवाच्या दर्शनास अवश्य जाऊन यावे.
शुभं भवतु: !

ग्लोबल न्युज नेटवर्क: