मराठा आरक्षणात चंद्रकांत पाटलांचे योगदान काय?संभाजीराजेंचा सवाल, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे

‘मी 2007 सालापासून मराठा समाजाच्या हक्कांसाठी, आरक्षणाकरिता लढा देत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यात केव्हा आले हे मला माहीत नाही, ते त्यांनाच विचारा. मराठा आरक्षणात चंद्रकांत पाटील यांचे योगदान काय?’ असे खडेबोल सुनावतानाच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चंद्रकांतदादांना चेपले. मी कोणाच्या मेहेरबानीने खासदार झालेलो नाही. राष्ट्रपतींनी माझी नियुक्ती केली आहे, असेही त्यांनी सुनावले.

खासदार संभाजीराजे छत्रपती आज कोपर्डी येथे आले होते. ‘निर्भया’च्या स्मारकाला अभिवादन करून त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच संभाजीराजे म्हणाले, ‘मला कोणी शिकवण्याची गरज नाही. 2007 सालापासून मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढा देत आहे आणि हे जनतेला माहीत आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांचे यात योगदान काय? मराठा आरक्षण लढय़ात पाटील केव्हा आले हे मला तरी काही आठवत नाही. तुम्ही (पत्रकारांनी) पाटील यांनाच विचारा. चंद्रकांत पाटील काय बोलतात हे मी ऐकण्याचेही कारण नाही. हे जर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत असतील तर त्यावर मी बोलेन’, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

जनतेला वेठीस धरण्याचे काम मी करणार नाही

मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे कोणत्याही आंदोलनाच्या निमित्ताने जनतेला वेठीस धरण्याचे काम मी मुळीच करणार नाही. हा लढा कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने सुरू राहिला पाहिजे अशी आपली भूमिका आहे, असे संभाजीराजे म्हणाले. राज्य सरकारकडे आम्ही पाच मागण्या मांडल्या आहेत. या मागण्या सरकारने तातडीने मंजूर कराव्यात. या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्हाला पुणे ते मुंबई विधान भवन असा मराठा मोर्चा काढावा लागेल, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

 

केंद्र व राज्य सरकारची समान जबाबदारी

सर्वोच्च न्यायालयाने जरी आम्हाला आरक्षण नाकारले असले तरी यासंदर्भात राज्य सरकारने परत याचिका दाखल करावी. यामध्ये पेंद्र व राज्य सरकारची समान जबाबदारी आहे. आयोग स्थापन करून राज्यपालांकडे जाता येईल, राष्ट्रपतींकडे जाता येईल. त्याचप्रमाणे पेंद्रीय मागास आयोगाकडे जाऊन त्यांच्याकडून राज्य मागासवर्गीय आयोगाला आदेश देता येईल आणि वेळ आली तर संसदेमध्येदेखील जाता येईल. यासाठी आता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, समाजाला यासाठी वेठीस धरू नये, असेही संभाजीराजे म्हणाले.

मोर्चा काढणार असे मी कधीही म्हणालो नाही

पुणे ः मराठा आरक्षणाबाबत आमचे धोरण सरळ आहे. मी मोर्चा काढणार, असे कधीही म्हणालो नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर मला काही बोलायचे नाही. ते लाख म्हणत असतील, पण मी मोर्चा काढणार असे म्हणालेलो नाही. माझ्या रायगड आणि मुंबईच्या भाषणात स्पष्ट म्हटले आहे की, आम्ही मूक आंदोलन करू, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली. कोपर्डी येथे जाण्यापूर्वी खासदार संभाजीराजे पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील खूप सांगत असतील. तो त्यांचा विषय आहे. मी कधीही मोर्चा काढणार, असे म्हणालो नाही. आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही. मराठा आरक्षणासाठी देशात आत्तापर्यंत समाज बोललाय, आम्ही बोललोय. आता लोकप्रतिनिधी बोलतील हे स्पष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: