” लक्ष्या नालायका काय करतोस तू हे गाढवा…” तात्याराव कडक आवाजात कडाडले…

 

आज माझी लक्ष्मी घरात येतेय तिच्या स्वागताची तयारी करा…” वाचाल अन विचार कराल…

” लक्ष्या नालायका काय करतोस तू हे गाढवा…” तात्याराव कडक आवाजात कडाडले…

ओठांना लिपस्टिक लावलेला, डोक्यावर ओढणी घेतलेला आरशासमोर स्वतःला न्याहाळत उभा असलेला लक्ष्या तात्यांच्या कडक आवाजाने चपापला…तात्यांचा क्रोधावतार पाहून त्याच्या हातातील लिपस्टिक खाली पडली आणि तो उभ्या उभ्या थरथर कापायला लागला…

” हरामखोर कसले उद्योग लावलेस हे?…काय अवतार करून घेतलास हा?…लाज नावाचा प्रकार शिल्लक आहे की नाही?…क्सक्सक्सक्स…” तात्या संतापाने ओरडत लक्षावर धावून गेले…हातात येईल त्या वस्तूने तात्यांनी त्याला बदडायला सुरुवात केली…त्यांचा आवाज ऐकून स्वयंपाकघरात काम करत असलेल्या मालतीबाई धावत बाहेर आल्या…तात्याराव लक्ष्याला अक्षरशः ढोरासारखे लाथाबुक्क्यांनी तुडवत होते…त्यांचा तो अवतार पाहून मालतीबाई दारातच थबकल्या… दरवाजाला घट्ट धरून लक्षाचा विकल आलाप ऐकत त्या अगतिक होत अस्वस्थपणे उभ्या राहील्या…लक्षाला वाचवायची त्यांची हिम्मत झाली नाही…

लक्ष्या तात्यारावांच्या हातापाया पडून दीनपणे जिवाच्या आकांताने आर्जव करत होता पण तात्यारावं त्याला हातातल्या काठीने कोणताही विचार न करता सपासप मारत होते…

 

तेवढ्यात अचानक रमाकांत धावतपळत घरात आला आणि तो मध्ये पडला…

” तात्याsss, तात्या नका मारू त्याला…मी माफी मागतो…तात्या जाऊ द्या…” तो लक्ष्यासाठी गयावया करू लागला पण तात्याराव काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते…लक्ष्याला वाचवायच्या नादात दोन चार फटके रमाकांतलाही बसले…कसंबसं स्वतःला सावरत त्याने लक्ष्याला उचलले आणि तात्यारावांच्या तावडीतून कसेबसे सोडवत तो त्याला घराबाहेर घेऊन गेला…ते दोघे बाहेर जाताच तात्याराव उद्विग्नपणे मटकन सोफ्यावर डोके धरून बसले…त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता…दारात भेदरून उभ्या असलेल्या मालतीबाईंकडे त्यांची नजर गेली अन तात्याराव अजून कडाडले…” कसली अवलाद पैदा केलीत हो ही…जन्म झाला झाल्या याला मारून का नाही टाकला… ही असली नालायक औलाद असल्यापेक्षा नसलेली बरी…गावात तोंड दाखवायची सोय राहिली नाही या पोरामुळं…”

तात्याराव डोकं धरून हमसून हमसून रडू लागले आणि मालतीबाई तिथेच उंबऱ्यावर बसून डोळ्याला पदर लावून मुसमुसत राहिल्या…

तात्यारावांना अन मालतीबाईंना यांना दोन मुलं… थोरला रमाकांत आणि त्यानंतर दोन वर्षांनी झालेला लक्ष्मीकांत…खरंतर त्यांना मुलगी हवी होती म्हणून त्यांनी दुसरा चान्स घेतला पण दुसराही मुलगा झाला त्यांच नाव लक्ष्मीकांत…

लहानपणी सगळं आलबेल होत पण जसजसा लक्ष्मीकांत मोठा होऊ लागला तसतसा त्याच्यात बदल होत चालला होता…तो घराबाहेर जास्त रमायचा नाही… सारखा सारखा घरातच असायचा…बाहेर मुलांमध्ये खेळायचा नाही की कोणती दंगामस्ती नाही…कोणताही मैदानी खेळ तो खेळलाच नाही… तो कायम एकतर घरात आईला स्वयंपाक मदत करत असायचा किंवा घरातच काही चित्र वगैरे काढत बसायचा …

सुरुवातीला कोणी हे जास्त मनावर घेतलं नाही पण जसजसा तो मोठा होतं गेला तसतसे त्याचे वागणे बदलत गेले…

एक दिवस त्याने डोक्याला टिकली लावलेली तात्यारावांनी पाहिली आणि हे काहीतरी भलतंच प्रकरण आहे याची त्यांना जाणीव झाली होती पण ते त्यांना पचवता येत नव्हते…लक्ष्मीकांतचे चालणे, बोलणे, वागणे अगदी बायकी होत चालले होते…गावात त्याची आता चर्चा व्हायला लागली होते…चार लोक जाता येता हसत होते अन हेच दुःख तात्यारावांना बोचत होतं…गावात त्याचा स्वतःचा व्यवसाय होता, चार लोकांत त्यांच्या शब्दाला मान होता पण या एका गोष्टी मूळे त्यांना मान खाली घालावी लागतं होती त्यामुळे त्यांचा संताप संताप होत होता…ते रोज लक्ष्मीकांतला घालूनपाडून बोलायचे…उठता बसता त्याचा पाणउतारा करायचे…त्याने सर्वसाधारण मुला प्रमाणे असावे म्हणून त्याला प्रचंड बोलायचे पण त्याच्यात काही फरक पडत नव्हता…

या उलट थोरला रमाकांत हा सगळ्या बाबतीत पारंगत होता…अभ्यासात अगदी हुशार, शाळेपासून कॉलेजपर्यंत तो नेहमी सगळ्या बाबतीत अव्वल असायचा…खेळ वगैरे अवांतर गोष्टीतही तो अग्रेसर असायचा…अनेक पुरस्कार, बक्षीस, प्रमाणपत्रे त्याला मिळालेली होती…आणि इतकं सगळं असुनही त्याचे पाय जमिनीवर होते, तो स्वभावाने खूप चांगला होतो…त्याने कधी लक्ष्मीकांतला कमी लेखलं नाही की कधी त्याला उलटसुलट बोलला नाही…तात्यारावांपासून तो कायम त्याला वाचवत आला होता…त्याला समजून घेत होता…

रमाकांत पुढील शिक्षणासाठी कॉलेजला म्हणून मुंबईला गेला…शिक्षण संपवून तो आता नोकरीच्या शोधात होता पण इकडे गावाकडे लक्ष्मीकांतचे हाल सुरू झाले…त्याला आजकाल रोजच मार पडत होता…त्याचे घराबाहेर जाणे बंद झाले होते…

आजच्या या प्रकाराने तर कळस झाला होता…तात्याराव पूर्णपणे तुटून गेले होते…रमाकांत लक्ष्मीकांतला आपल्या मित्राच्या घरी सोडून पुन्हा घरी आला…घरातील वातावरण अजूनही गंभीर होत…तात्याराव आणि त्याची आई मालतीबाई आहे तसेच खिन्नपणे बसून होते…

रमाकांत घरी आला आणि आईच्या शेजारी जाऊन बसला…आईच्या खांद्यावर हात टाकत तिला थोपटवत तो तात्यारावांना म्हणाला,

” तात्या, मी लक्ष्मीकांतला माझ्या बरोबर मुंबईला घेऊन जातोय…रोजच्या या कटकटीमुळे उगाच तुम्हाला येथे त्रास नको…”

” अरे पण तुझेच तिथे कसेबसे भागत त्यांत तू याला घेऊन गेलास तर कसं होईल…” मालतीबाई काळजीने म्हणाल्या…

” आई मी बघून घेईन, चिंता करू नकोस…मी सांभाळीन त्याला…” रमाकांत आश्वासक सुरात आईचा हात हातात घेत म्हणाला…

” घेऊन जा त्या दिवट्याला…पुन्हा आयुष्यात त्याला माझ्या डोळ्यासमोर आणि या गावात आणू नको…तिकडे मुंबईत त्याचं काय करायचं ते कर पण ही अशी औलाद पुन्हा इकडे आणू नको…माझ्यासाठी तो मेला… घेऊन जा…” तात्याराव वैतागून चिडून म्हणाले…मालतीबाईंनी रमाकांतकडे पाहिले आणि आपल्या आईच्या खांद्यावर थोपटवत तिला आश्वस्त करत तो उठला

दुसऱ्याचं दिवशी रमाकांत लक्ष्मीकांतला घेऊन मुंबईला रवाना झाला…

दिवसा मागून दिवस जात होते…रमाकांतला आता छोटीशी नोकरी लागली होती त्यात त्या दोघांचे जेमतेम भागत होते…रमाकांत त्याच्या परीने लक्ष्मीकांतचे नवे आयुष्य बसवण्याचा प्रयत्न करत होता…त्याची ख्याली खुशाली आईला कळवत होता…

असेच अजून दोन चार वर्षे गेले…रमाकांत अधूनमधून गावात यायचा पण घरात लक्ष्मीकांतचा विषय काढत नव्हता…तो काय करतोय वगैरे कसल्याच गोष्टी तात्यारावांमुळं बोलतं नव्हता…लक्ष्मीकांत आपल्या भावाकडे सुखरूप आहे या विश्वासावर मालतीबाई आश्वस्त होत्या…

पुढच्या दोन वर्षात रमाकांत चांगलाच स्थिरस्थावर झाला आणि त्याला परदेशात जायची संधी चालून आली…आणि बघता बघता तो निघूनही गेला…

” मी लक्ष्मीकांतची छान सोय करून दिली आहे तू चिंता करू नको” असे आश्वासन आईला देऊन तो कायमचा परदेशात निघून गेला…पुढच्या एक दोन वर्षात त्याने तिकडचं असलेल्या त्याच्या एका कॉलेज मैत्रिणीबरोबर लग्न केले…

आता रमाकांत परदेशात स्थिरस्थावर झाला होता…त्याला आता एक मुलगीही झाली होती…लक्ष्मीकांत काळाच्या ओघात विस्मरणात गेला होता…

 

तात्याराव आता जरा वयस्कर झाले होते…त्यांनी आपला गावातला व्यवसाय आटोपता घेतला …घर देवपूजा, मंदिर आणि गावातील चार मंडळी यांत त्यांचा दिवस सरत होता…रमाकांत वेळोवेळी भरभरून पैसे पाठवत होता…त्याच पैशातून तात्यारावांनी आपल्या गावातल्या घराचं नूतनीकरण केलं होतं…सगळं काही आलबेल होत…मालतीबाई आपल्या घर संसारात मग्न होत्या…लक्ष्मीकांत नाव मनात ठसठसत होत पण तात्यारावांमूळे त्या कधी विषय काढत नव्हत्या…

 

सगळं कसं छान सुरू असताना अचानक एक दिवस तात्याराव घरात पेपर वाचत असताना छातीत कळ येऊन कोसळले… मालतीबाई जाम घाबरल्या…त्यांनी लगबगीने शेजारीपाजार बोलावून तात्यारावांना दवाखान्यात नेलं…त्यांना हृदविकाराचा झटका आला होता…रमाकांतला फोन गेला…रमाकांतने गावातल्या आपल्या काही मित्राच्या मदतीने त्यांना ताबडतोब गाडी करून शहरात मोठ्या दवाखान्यात भरती केलं…वेळेत उपचार सुरू झाले…डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल अशी सूचना केली…रमाकांतने झटपट पैसे पाठवले…त्याचे मित्र दवाखान्यात सोबतीला होतेच…आणि यथावकाश अगदी वेळेत तात्यारावांचे ऑपरेशन यशस्वी पार पडलं…रमाकांतला परदेशातून ताबडतोब येणे शक्य नव्हते…तो तेथूनच फोनवरून ही सगळी व्यवस्था पहात होता, सांभाळत होता….

 

ऑपरेशन्स यशस्वी झाले…तात्याराव एका मोठ्या जिवावरच्या संकटातून वाचले… रमाकांतने परदेशात असूनही वेळेत घेतलेल्या योग्य निर्णयामुळे आज तात्याराव सुखरूप घरी परत आले होते… तात्यारावांना आणि मालतीबाईंना आपल्या या मुलाचा अभिमान होता…

 

पुढे सहा महिने गेले…तात्याराव आता चांगले ठणठणीत बरे झाले होते…आता ते व्यवस्थित हिंडायला फिरायला लागले होते…दिवाळीचा सण जवळ आला होता…तात्यारावांनी रमाकांतला सहकुटुंब दिवाळीसाठी भारतात येण्याचा आग्रह केला…रमाकांतने विचार केला की तात्याराव इतक्या मोठ्या आजारातून बाहेर पडलेत, आपण भेटायला हवं आणि त्यात दिवाळी ही सहकुटूंब साजरी करता येईल…म्हणून त्याने होकार भरला आणि दिवाळीच्या चांगले चार दिवस आधी तो सहकुटुंब गावात दाखल झाला…

 

त्याला गावात येऊन एक दोन दिवस झाले असतील…सगळं घर आनंदाने भरून गेलं होतं…नातवंड घरात खेळत बागडत होती ते पाहून तात्याराव आणि मालतीबाई हरखून गेले होते…मुलासाठी, नातवंडासाठी, सुनेसाठी काय काय करू आणि काय नको असे त्या दोघांना झाले होते…

 

दिवाळीच्या आधीच्या रात्रीची वेळ…सगळे जेवण करून गप्पा मारत बसले होते…मुलं झोपी गेले होती…दिवाणखान्यात जमिनीवर गाद्या टाकून त्यावर ऐसपैस बसत गप्पा सुरु होत्या…बोलता बोलता विषय कसा कोण जाणे लक्ष्मीकांतवर येऊन थांबला…त्याचं नाव निघताच मालतीबाईंच्या चेहऱ्यावर एक करूण चिंता उमटली…तात्यारावांचा चेहऱ्यावर एक त्रस्त आणि उद्विग्न भाव दिसून आले…

 

रमाकांत आपल्या जागेवरून उठला आणि तात्यारावांच्या जवळ जाऊन बसला…तात्यारावांचा हात आपल्या हातात घेत तो अगदी धीरगंभीर आवाजात म्हणाला…

 

” तात्या तुम्ही विसरून नाही जाऊ शकत का?…माफ करा , सोडून द्या…तुम्हाला माहीत आहे का, की मी या वेळी दिवाळीत का आलोय भारतात…मी आलोय ते फक्त लक्ष्मीकांतसाठी…तात्या आज तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगतो जी तुम्हाला माहीत नाही…आजपर्यंत मी हे तुम्हां पासून लपवून ठेवलं पण आज सांगणे भाग आहे आणि त्यांचसाठी मी आलोय…तात्या तुम्हाला माहीत आहे का तुमच्या हृदयाचे यशस्वी ऑपरेशन कोणी केलं?…”

 

” होय माहीत आहे, एका निष्णात तज्ञ अशा महिला सर्जन डॉक्टर लक्ष्मी रावं यांनी…” तात्याराव म्हणाले…

” अहो तात्या, या डॉक्टर लक्ष्मी रावं म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपला लक्ष्मीकांत आहे…अहो तो आता साधा लक्ष्मीकांत नाही राहिला…प्रख्यात सर्जन डॉक्टर लक्ष्मी रावं म्हणजे हा आपला लक्ष्मीकांत, ज्याने तुमचे ऑपरेशन केलं…त्यानं नुसतंच ऑपरेशन केलं नाही तर तुमच्या सर्व गोष्टींची देखभाल केलीय…सगळं खर्च त्यानेच उचलला…मी तिकडे परदेशात होतो पण सगळं काही सहजपणे डॉक्टर लक्ष्मीमुळे पार पडले…तुमच्या समोर यायचं नाही म्हणून अहोरात्र पंधरा दिवस पडद्यामागून सगळी सूत्र डॉक्टर लक्ष्मी बघत होत्या…हाच तो आपला लक्ष्मीकांत…तात्या अजून काय करायला हवं त्यानं…माफ करा तात्या पण आज तो नसता तर तुम्हीही हयात नसता…त्यानं जे केलं ना ते मी येथे असतो तरी करू शकलो नसतो…”

 

बोलता बोलता रमाकांतच्या गळ्यात आवंढा दाटून आला…त्याचे डोळे भरून आले…तो बोलता बोलता थबकला…तसं त्याची बायको पटकन पाणी घेऊन आली…ते पाणी नवऱ्याला देत त्याच्या पाठीवरून हात फिरवत ती तात्यांना म्हणाली…

 

“तात्या, तुम्हाला काही गोष्टी माहीत नाहीत पण आज मी तुम्हाला सांगते…लक्ष्मीकांतला मुंबईला नेऊन यांनी त्याच्या सगळ्या आयुष्याची सोय केली…त्याला वेळ दिला…लक्ष्मीकांतला जे हवं ते करू दिलं…लक्ष्मी मुळातच हुशार होता आणि आहे पण परिस्थितीमुळे बुजला गेला होता…रमाकांतने मोठ्या भावाच्या नात्याने त्याला पुन्हा उभा केला…त्याला त्याच खासगी आयुष्य सांभाळू देत त्याच्या शिक्षणाची सोय केली…पहिले दोन वर्षे स्वतः खस्ता खाल्या पण त्याच्या शिक्षणाचे पैसे उभे केले…रमाकांत आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकलो,प्रेम करायचो…परदेशात खूप आधीच सहज लग्न करू शकलो असतो पण लक्ष्मी स्वतःच्या पायावर उभा रहावा आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहिल्याशिवाय लग्न करणार नाही हा रमाकांतचा दृढ निर्णय म्हणून आम्ही आमचं लग्न दोन वर्षे पुढे ढकलले…

 

लक्ष्मी डॉक्टर झाला आणि मग यांनी माझ्याशी लग्न केलं…तात्या, माफ करा आणि त्याला पोटात घ्या..आपल्याचं घराचा अंश आहे…मला सांगा उद्या जर रमाकांत आंधळा बहिरा असता तर तुम्ही त्याला असाचं वाऱ्यावर सोडला असता का?…अहो काही माणसं खास असतात, देवाने त्यांना खास बनवलेलं असतं मग आपण त्यात लुडबुड का करायची?…तात्या जरा आईचा विचार करा…इतके वर्षे त्यांनी तुमच्यासाठी, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून काळजावर दगड ठेऊन लक्ष्मीबद्दल चकार शब्द काढला नाही…पण आता तरी त्यांना भेटू देत…एका लेकराला आईपासून लांब ठेऊ नका…आईचे काळीज काय असतं हे आई म्हणून मी चांगले जाणते…तेंव्हा ही हात जोडून विनंती की हा राग सोडा आणि लक्ष्मीला पदरात घ्या…” सुनेच्या या बोलण्याने मालतीबाई डोळ्याला पदर लावून रडू लागल्या…तात्याराव मात्र मख्ख चेहऱ्याने ऐकत होते…ते काहीच बोलले नाहीत…बहुदा अजूनही त्यांना या गोष्टी पटत नव्हत्या…

 

” चला झोपुयात सकाळी अभ्यंग स्नानाला लवकर उठायचे ना?…” तात्याराव निर्विकारपणे म्हणाले…तात्यारावांची अशी रुक्ष प्रतिक्रिया पाहून सगळेजण हताश होत झोपायला गेले…

पहाटे एक एक करून सगळे उठून आपआपल्या कामाला लागले…तात्याराव घरात नव्हते…नेहमीप्रमाणेच लवकर उठून फिरायला बाहेर गेले असतील म्हणून कोणी लक्ष दिले नाही…

 

बरोबर नऊ साडे नऊ वाजता तात्यारावांच्या घरासमोर एक आलिशान गाडी येऊन थांबली…गाडीचा आवाज ऐकून सगळे बाहेर आले…तात्याराव गाडीतून खाली उतरले, त्यांनी गाडीचा मागचा दरवाजा उघडला…हाताला धरून त्यांनी लक्ष्मीला बाहेर आणले… तिचा हात हातात धरत ते तिला दरवाजात घेऊन आले…सगळे अचंबित होऊन बघत होते…सगळ्यांच्या तोंडाचा आ झालेला होता…

दरवाजात येताच त्यांनी जोरात मालतीबाईंना आवाज दिला…

 

” अहो अशा भुतासारख्या बघत काय उभ्या राहिलात…आज दिवाळी आहे, दारात लक्ष्मी आलीय…तिला काय अशीच ताटकळत दारातच उभी करणार का?…जा पटकन औक्षणाचे ताट घेऊन या…आज माझी लक्ष्मी घरात येतेय तिच्या स्वागताची तयारी करा…”

 

मालतीबाईं डोळ्याला पदर लावत लगबगीने औक्षणाची तयारी करायला आत गेल्या…रमाकांतच्या डोळ्यात कृतार्थ भाव पसरले होते…तात्याराव लक्ष्मीच्या खांद्यावर हात ठेवून तिला कवेत घेऊन अभिमानाने बघत होते…

लक्ष्मीच्या डोळ्यात लक्ष लक्ष दिव्यांची आतिषबाजी झळकत होती…

कुलकर्ण्यांचा ” कथाकार ” प्रशांत

तळटीप – किन्नर हे सुध्दा एक सजीव मनुष्य प्राणी आहेत…त्यांनाही आपल्यासारखाच जगण्याचा अधिकार आहे…त्याचा सन्मान केला गेला पाहिजे आणि जमेल तशी त्यांना पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी हीच अपेक्षा…

ग्लोबल न्युज नेटवर्क: