राज्यपाल नियुक्त १२ आमदारांशी आमचा संबंध नाही

जळगाव : महाविकास आघाडी सरकारकडून येणारी विधान परिषदेवरील १२ नावे बाजूला काढण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांच्यात चर्चा झाली असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. यावरून आता भाजप नेत्यांनी हल्लाबोल चढवण्यास सुरुवात केली आहे.राज्यपाल नियुक्त आमदारांशी आमचा काही संबंध नाही, असे म्हणत भाजप आमदार गिरीश महाजन यांनी हसन मुश्रीफ यांचा आरोप फेटाळला आहे. जळगावमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसंदर्भात सरकारने नावे राज्यपालांकडे पाठवली आहेत. त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. निकषानुसार राज्यपाल त्यांची निवड करतील, असे स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिले. यासह भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी देखील मुश्रिफांच्या दाव्याचे खंडन केले आहे. गावगप्पांचा आधार घेत ग्रामविकास पदावर असणारे हसन मुश्रीफ हे असे गंभीर आरोप करतात. जे काम आपल्याला झेपत नाही, त्याच्याबद्दल आधीपासूनच अफवा पसरवायची, खोटे बोलत राहायचे, दुसऱ्याच्या नावाने अपप्रचार करायचा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण असल्याची टीका माधव भंडारी यांनी केली आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असताना हसन मुश्रीफ यांनी मोठा गौप्यस्फोट करून एकच खळबळ उडवून दिली. देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांशी चर्चा झाली आहे. सरकारकडून आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचे ठरलेले आहे, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांनी हा आरोप केला ज्याला गिरीश महाजन यांनी फेटाळून लावले आहे.

दरम्यान, गिरीश महाजन यांनी यावेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरही निशाण साधला. खडसेंनी आमचा पक्ष सोडला आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच कुणीही राजीनामे देत नाही, कुणीही पक्ष सोडून जाणार नाहीत. कुणीही आमदार त्याठिकाणी जाणार नाही. कोणताही नगरसेवक, जिल्हा परिषदेचा सदस्य जाणार नाही हे सूर्य प्रकाशा एवढे स्वच्छ आहे, असे म्हणत त्यांनी खडसेंच्या दाव्याला फटकारले. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी खडसेंनी भाजपचे १२ आमदार आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: