आम्ही फक्त तीन राजेंना मानतो : प्रकाश आंबेडकर

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले आमनेसामने आले आहेत. उदयनराजे बिनडोक असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केल्यानंतर उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. आता त्यालाच प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे आणि ती कायम राहील, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंबेडकर आणि उदयनराजे यांच्यामधील वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. मात्र, मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीकास्त्र सोडले होते. ‘एक राजा तर बिनडोक आहे. असं मी म्हणेन, दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. उदयनराजे भोसले आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं म्हणतात. भाजपने यांना राज्यसभेवर कसं पाठवलं तेच कळत नाही’ असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: