वारकऱ्यांनी तुडुंब भरलेलं पंढरपूर पहायचं आहे, मुख्यमंत्र्यांचे विठूमाऊलीकडे साकडे |

 

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते, विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. आज सकाळी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली.

आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. पण गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी पोलीस प्रशासनाने वारकऱ्यांसाठी थोडी मुभा दिली आहे. पंढरपुरात मानाच्या दहा पालख्या दाखल झाल्या आहेत. यंदा दरवर्षीसारखा जरी जल्लोष होणार नसला तरी प्रत्येक पालखीसोबत यावर्षी ३० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.

या पुजेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे राज्यावरचं कोरोनाचं संकट दूर होऊ दे असं साकडं घातलं. एरवी पंढरपूरला वारीच्या निमीत्ताने १० लाखांच्या घरात वारकरी हजेरी लावत असतात. परंतू यंदा कोरोनामुळे पायी वारी सोहळ्याला परवानगी नाकारण्यात आली होती. आषाढीच्या निमीत्ताने वारकऱ्यांनी तुडुंब भरलेलं पंढरपूर आम्हाला पुन्हा एकदा पहायचं आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यावरचं कोरोनाचं संकट दूर व्हावं अशी प्रार्थना केली.

Team Global News Marathi: