जनसामान्यांचा नेता आणि कार्यकर्त्यांचे मित्र होते विलासराव देशमुख साहेब..!

दोन वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचे एकमेकांशी पटत नाही; तिथं विलासराव देशमुख साहेबांनी सर्वांशी मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचे नाते निर्माण करत राजकारण केलं. कोणाच्याविषयी मनात द्वेष, अढी न ठेवता, जे काही असेल ते स्पष्ट बोलून टाकायचं असा स्वभाव असणारे, विरोधी पक्षातील कित्येक राजकारण्यांशी त्यांची जिव्हाळ्याची मैत्री होती त्यांची. माध्यमे काय म्हणतील, कार्यकर्ते काय म्हणतील, असा विचार त्यांनी कधी केला नाही. खुल्या दिलाने राजकारण करणारा महाराष्ट्रातील दिलदार नेता म्हणजे विलासराव देशमुख साहेब यांना उभा महाराष्ट्र ओळखत होता.

लातूर जिल्यातील बाभळगावचे सरपंच, पंचायत समितीचे उपसभापती, आमदार, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि केंद्रीय मंत्री असा पायऱ्या चढत-चढत यशाचे शिखर काबीज करणारे विलासराव. मात्र, पाय त्याच बाभळगावच्या मातीत पाय घट्ट रोवून उभा होते. कित्येक वादळे आली, चढ आले उतार आले. मात्र, विलासराव देशमुख साहेब डगमगले नाहीत. त्याच बरोबर त्यांनी कधीही आपली राज्याच्या सर्वोच्च पदी विराजमान होण्याची महत्त्वाकांक्षा लपवून पण ठेवली नाही. स्वप्न पाहिले; आणि ते साकार पण केलं. ही गोष्ट राजकारणात वाटते तितकी लहान नाही.

विलासराव देशमुख साहेब यांचे प्रशासकीय गुरु समजले जाणारे शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख यांच्याकडे जबाबदार अशी मुख्य आठ खाती होती. त्यांना मिनी चीफ मिनिस्टर म्हणून त्या काळी ओळखले जायचे. मात्र, ते त्या खात्यांना न्याय देण्याचे, तितक्याच ताकदीने काम करण्याची चुणूक विलासराव यांच्याचमध्ये होती हे मात्र नक्कीच.

किल्लारीमधील भूकंप असो, मुंबईमधील पुर परिस्थिती असो.. यामध्ये संयमाने, ताकदीने, आणि धैर्याने सामोरे जाणारे विलासराव महाराष्ट्राने पाहिले आहेत. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना किल्लारी पुन्हा उभा करण्यात असलेलं त्यांचं कार्य असेल. किंवा पुराच्या नंतर पुन्हा मुंबई त्याच वेगाने सुरू झाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम असेल. हे सर्व जगाला तोंडात बोट घालण्या इतकं मोठं काम होते. असे असंख्य कामे त्यांनी केली.

महाराष्ट्रात काँग्रेसची एक व्याख्या, मोजक्या शब्दांत व्यक्त केलेलं काँग्रेसचे स्वरूप आजही ओठा ओठावर आहे. हजारो, लाखो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिशा देणारं विलासरावांचे भाषण आजही जनमानसात तितकंच प्रसिद्ध आहे. त्यांचा अभ्यास, व्यासंग, त्यांची वक्तृत्वावर असलेली पकड, जनसामान्य माणसाला समजून सांगण्याची पद्धत ही महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये विलासराव देशमुख साहेब यांच्याचमध्ये होती. काँग्रेस महाराष्ट्राला समजून जर कोणी मोजक्या शब्दांत सांगितली असेल तर विलासराव देशमुख साहेब यांनी.

“लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालेलं आहे. अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे. ते संपले काँग्रेस नाही संपली. हा एवढा प्रचंड इतिहास या काँग्रेसचा आहे. त्यागाचा, बलिदानाचा देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे. ही काँग्रेस अशी कोणाला संपवता संपू शकत नाहीय. काँग्रेसने नेहमीच गरिबांचा विचार केला आहे”, हे विलासराव देशमुख साहेबांचे शब्द आजही असेच कानात गुंजत आहेत. जितक्या तन्मयतेने ऐकले आहेत; तितक्याच प्रेमाने हृदयात साठवून ठेवले आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते, आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

लेखक : गणेश शिंदे सरकर

ग्लोबल न्युज नेटवर्क: