आठवणीतील विलासराव देशमुख ; श्रद्धा बेलसरे-खारकर यांच्या लेखणीतून

आठवणीतील विलासराव देशमुख ; श्रद्धा बेलसरे-खारकर यांच्या लेखणीतून

विलासराव देशमुख यांची माझी ओळख १९८०च्या सुमारास झाली. तेंव्हा ते नुकतेच आमदार झाले होते. मी पुष्कळवेळा सूर्यकांताताईबरोबर फिरत असे तेंव्हा साहेबांशी ओळख झाली. टपोरे भावपूर्ण डोळे, केसांचा ऐटबाज कोंबडा, नीटनेटके कपडे, हजरजबाबीपणा असलेले त्यांचे एकूणच व्यक्तिमत्व आकर्षक होते.

मी १९८३ला औरंगाबादला तरूण पत्रकारांसाठी ३ दिवसाचे प्रशिक्षणशिबीर आयोजीत केले होते. त्याचे उद्घाटक होते तेंव्हा माहिती राज्यमंत्री झालेले विलासराव देशमुख! प्रमुख पाहुणे होते मुकुंदराव किर्लोस्कर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष होते मराठवाडा दैनिकाचे संपादक कैं. अनंतराव भालेराव. त्यावेळी मी त्यांचे भाषण प्रथमच ऐकले. पत्रकारितेविषयी त्यांनी जे मार्मिक आणि मिस्कील भाषण केले होते ते आजही आठवते. त्यानंतर बोलताना मुकुंदराव किलोस्कर देशमुखसाहेबांचा उल्लेख सारखा ‘मुख्यमंत्री’ म्हणून करत होते. मी त्यांना सांगितले की हे ‘माहिती खात्याचे राज्यमंत्री’ आहेत्त. त्यावर मुकुंदराव म्हणाले, ‘अरे, होतील की मुख्यमंत्री! त्यावेळी अनंतराव भालेराव म्हणाले ‘माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. लवकर मुख्यमंत्री व्हा.’

एकदा सहज बोलता बोलता त्यांनी मी राजकारणात यावे असे मला सूचित केले. पण मला राजकारण आवडत नव्हते. मग ते म्हणाले, ‘काय करायचं ठरवलं पूढे?’ मी म्हटले, ‘सर, मला पत्रकार व्हायचे आहे.’ मात्र दोन्हीही न होता पुढे मी माहिती खात्यात नोकरीला लागले. देशमुखसाहेब महात्वाकांशी होते आणि त्यांना मराठवाड्याचा अभिमान होता. शिक्षणमंत्री असताना त्यांनी ‘शिक्षक पुरस्काराचा’ कार्यक्रम त्यांनी आग्रहाने मुंबईबाहेर लातूरला घेतला. त्यावेळी राज्यपाल होते शंकरदयाळ शर्मा. योगायोगाने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली.

एकदा ‘राशीचक्र’कार शरद उपाध्ये यांचा जुहू येथे राशीचक्राचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि विलासराव देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नुकतेच मतदान झाले होते. मतदानाचा निकाल येण्यास १ महिन्याचा अवधी होता. त्यावेळी भाषण करताना शरद उपाध्ये म्हणाले की मला असे दिसते आहे यावर्षी विलासरावजी मुख्यमंत्री होतील आणि माधुरी दीक्षित यांना मंगळागौरी पूजनाचा योग आहे आणि पुढे दोघांबाबत तसेच घडले. विलासरावजी मुख्यमंत्री झाले!

मंत्रालयात मी लोकराज्य मासिकाची संपादक होते. त्यानिमित्ताने अनेकदा मुख्यमंत्र्यांशी भेटी होत असत. सुप्रसिद्ध कवी जगदीश खेबुडकर यांच्या वेबसाईटचे ऊदघाटन करायचे होते. ते आमच्या कार्यालयातील मिनी थियेटरमध्ये ठरले होते. त्यावेळी त्यांनी केलेले भाषण एखाद्या नामवंत साहित्यिकाला शोभणारे होते. ते म्हणाले, ‘खेबुडकरजी तुमची गाणी ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. ‘संकेतस्थळ’ म्हणजे काय? ते तुम्ही आम्हाला सांगितलेत. त्याने आणि तिने एकांतात भेटावे आणि ते स्थळ कुणाला माहित नसावे अशी आमची भाबडी समजूत तुम्ही करून दिलीत. आम्हीही तेच प्रमाण धरून चालत आलो. आणि आज मात्र तुम्ही तुमचे ‘संकेतस्थळ’ असे जगजाहीर करत आहात. काय करायचे आम्ही आता?’ संकेतस्थळ या एकाच शब्दावर त्यांनी इतकी मल्लीनाथी केली की ऐकणारे श्रोते हसूनहसून बेजार झाले होते. अशीच एक सुंदर आठवण श्रीनिवास खळे यांना लोकमतने दिलेल्या पुरस्काराच्या वेळेची आहे. ते म्हणाले होते, ‘खळं आम्हा शेतक-यांना माहित आहे, चंद्राभोवतीचे खळे आम्हाला माहित आहे. शेतात पिक काढल्यावर उभारलेल्या धान्याच्या राशींचे खळे माहित आहे, एवढेच कशाला गालावर पडणारी खळीही आम्हाला माहित आहे. पण खळेसाहेब तुम्ही संगीतविश्वात निर्माण केलेले अद्भुत खळे मात्र कल्पनातीत आहे!’
एक दिवस पत्रकार मकरंद गाडगीळ माझ्याकडे आले आणि म्हणाले, सहाव्या मजल्यावर खिडकीजवळ एक पक्षी अडकून बसला आहे. तो जखमी दिसतोय आपल्याला काही करता येईल का? मी सहाव्या मजल्यावर जावून बघितले तर एक घुबड जखमी अवस्थेत खिडकीजवळ होते. तिथून आमच्या खात्याचा फोटोग्राफर जात होता मी त्याला म्हटले, ‘अरे याचा फोटो घे रे.’ आम्ही खाली आलो आणि लगेच वनखात्यात फोन करून त्या जखमी पक्षाला घेऊन जायला सांगितले. तोवर ‘मंत्रालयात घुबड’ ही बातमी सर्वत्र पसरली. बरेच जण माझ्या खोलीत आले. घुबड अशुभ असते, ते पितृपक्षात नेमके सहाव्या मजल्यावर बसलंय, त्याची नजर मुख्यमंत्र्यांच्या केबिनकडे आहे. म्हणजे आता मुख्यमंत्री बदलणार अशा चर्चा सुरु झाल्या. मी ७ वाजता घरी गेले. मला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला. ‘तुम्ही घुबडाचे फोटो वितरीत केलेत काय?’ मी सांगतले ‘नाही. काढले आहेत ही गोष्ट खरी आहे. वितरीत केलेले नाहीत.’ मी ती गोष्ट विसरूनही गेले. दुसरे दिवशीच्या काही वृत्तपत्रात घुबडाच्या बातम्या झळकल्या. एकदोन पेपरनी तर ‘ही चर्चा माहिती संचालकांच्या कार्यालयात घडली’ असेही मुद्दाम खोडसाळपणे लिहिले होते. पुढे दोन दिवस मुख्यमंत्र्यांच्या सचिवानी माझी चौकशी केली. वातावरण खूप तापले. आता बहुतेक माझी नोकरी जाणार अशा चर्चा होऊ लागल्या. एक दिवस सचिवांनी माझी खूप कानउघाडणी केली. माझी चूक काहीच नव्हती. उलट एका पत्रकाराच्या चांगल्या सूचनेवरून आम्ही त्या पक्षाला वनखात्याची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. मग माझा संयम सुटला. मी म्हटले ‘साहेब, गेले तीन दिवस मी तुम्हाला हेच सांगते आहे की मुक्या आणि जखमी प्राण्याला वनखात्याकडे सुपूर्द करण्याचे पाप मी केले आहे! आता यापुढे काही स्पष्टीकरण द्यायचे असेल तर मी सी.एम. साहेबांना देईन, तुम्हाला नाही!’ दुसरे दिवशी मुख्यमंत्र्यांची पत्रकारपरिषद होती त्यात एका पत्रकाराने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की सहाव्या मजल्यावर एक घुबड आले होते… त्याचा प्रश्न मध्येच तोडत देशमुखसाहेब म्हणाले, ‘महाराष्ट्रातील माणसांचे सर्व प्रश्न संपले आहेत काय?’ आणि त्यांनी तो विषय संपविला. अशा प्रकारे त्यांनी मला अभय दिले.

माझ्या खात्याच्या काही बढत्या, बदल्या किंवा इतर काही कामे असतील तर मला त्या फाईलीवर मुख्यमंत्र्यांच्या सह्या घ्यायला मला त्या त्यांच्या कार्यालयात न्याव्या लागत असत. मुख्यमंत्री खुणेनेच विचारत की ‘विषय काय आहे?’ मी विषय सांगतल्यावर ‘सगळे बरोबर आहे ना’ इतकेच ते विचारत आणि फाईल न वाचता सही करायचे. त्यांना माणसाची फार चांगली पारख होती.
एकदा सर्व सचिवांची बैठक होती. पुढील ५ वर्षासाठीचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यात येत होते. प्रत्येक सचिव डोळ्याला चष्मा, जवळ फाईलचे गठ्ठे, मागे दोनचार सहाय्यक घेऊन आपापल्या खात्याविषयी बोलत होते. स्वत: मुख्यमंत्री ऐकताहेत म्हटल्यावर सगळ्यांचे चेहरे तणावग्रस्त होते. विलासरावजी मात्र एखाद सुंदर नाटक रसिकतेने बघावे इतक्या सहजतेने बसले होते. डोळ्यावर चष्मा नाही. कपाळावर आठ्या नाहीत. समोर कागदपत्रांचा, फाईलींचा ढिगारा नाही. सचिवांचे सादरीकरण झाल्यावर ते एखादाच प्रश्न विचारीत, चारपाच सचिवांच्या सादरीकरणावर त्यांनी चक्क आकडेवारीच्या चुकाही दाखवून दिल्या. त्यावेळची त्यांची प्रशासनावरची पकड, अफाट स्मरणशक्ती, शांतपणे ऐकून घेण्याची वृत्ती, आणि समोरच्याचा अपमान न करता चुका दाखवण्याची पद्धती अतुलनीय होती.
जेंव्हा आमचे ‘लोकराज्य’ देशातील सर्वाधिक खपाचे मासिक ठरले तेंव्हा त्यांची त्याची नोंद घेतली. संपादकीय पानावर नावे असलेल्या मुख्य संपादक ते मुद्रितशोधक अशा प्रत्येकाला बोलावून स्वत:ची स्वाक्षरी असलेले पत्र देवून आमचे अभिनंदन केले. एरव्ही फक्त संपादकाचेच कौतुक होत असते. हाच अनुभव मला ‘महान्युज’ वेबपोर्टलच्या वेळी पण आला. ह्या देशातील पाहिल्या सरकारी न्यूजपोर्टलचे उद्घाटन झाल्यावर माझे काही सहकारी सभागृहाच्या दाराशी उभे होते तिथून बाहेर पडताना मुख्यमंत्र्यांनी मला हाक मारली मी धावत तिकडे गेले. त्यावर ते हसून म्हणाले, ‘अहो या इथे उभे रहा. तुमच्या सगळ्यांबरोबर मला माझा फोटो हवा आहे.’ आमचे सर्व कर्मचारी खुश झाले!

एक दिवस सह्याद्री अतिथीगृहावरची बैठक संपवून मी घरी येत होते. तीन बत्ती नाक्याजवळ माझी गाडी बंद पडली. मी ड्रायव्हरला म्हटले, ‘गाडी बाजूला लावून मेकॅनिकला बोलवा.’ त्यावेळी सायंकाळचे ७ वाजले होते. किंचित पाउस भुरभुरत होता. मी रस्त्यात उभी राहून येणा-या टॅक्सीला हात दाखवत होते. इतक्यात फटाफट गाड्या आल्या. म्हणून मी मागे सरकले तो मुख्यमंत्र्यांच्या ताफा होता. अचानक सर्व गाड्या थांबल्या. शेवटच्या गाडीतील एक पोलीस अधिकारी माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, ‘साहेब विचारताहेत तुम्ही इथे का थांबला आहात?’ मी विचारले ‘कोणते साहेब?’ त्यावर उत्तर आले, ‘सी.एम. साहेब.’ मी म्हटले ‘गाडी बंद पडली म्हणून टॅक्सीची वाट बघतेय.’ त्या अधिका-यांनी हे फोनवरून कुणालातरी सांगितले. ते मला परत म्हणाले, ‘मॅडम, तुम्हाला सी.एम. साहेबांनी या गाडीत बसायला सांगितले आहे. मी गाडीत बसले. मी वाहनचालकाला विचारले ‘तुम्ही कुठे निघाला आहात?’ ते म्हणाले, ‘नरीमन पाँइंट’ला एका प्रोग्रामसाठी जात आहोत.’ मी त्यावेळी वरळीला राहत होते. मी म्हटले, ‘मी बाबुलनाथला उतरते, तेथून मी जाईन.’ त्यावर ते म्हणाले, ‘नाही नाही असे करता येणार नाही, आम्हाला आदेश आहे की तुम्हाला घरी नेऊन सोडायचे आणि तुम्ही घरी पोहोचल्यावरच आम्ही जायचे. शिवाय तुम्ही घरी पोहोचल्याचे साहेबांना कळवायचे आहे.’

सी.एम.साहेबांबद्दल गाडीची अजून एक आठवण आहे. एकदा वरिष्ठ अधिका-याशी मतभेद झाल्यामुळे माझी ‘मराठी भाषा संचालक’ म्हणून तडकाफडकी बदली करण्यात आली. मला देशमुखसाहेबांचे पी.ए. श्री रवी जोशींचा फोन आला- ‘साहेबानी तुम्हाला उद्धा भेटायला बोलावले आहे.’ त्यावेळी साहेब केंद्रसरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री होते. मी भेटायला गेले. त्यांनी मला न दुखावता विचारले, ‘नवे काम कसे चालले आहे? मी म्हटले, ‘ठीक आहे सर!’ ते म्हणाले, ‘तुम्ही लोकराज्य आणि महान्यूजचे काम फार छान केले होते. आता नव्या ठिकाणीही चांगले काम करा.’ मी प्रत्यक्षात खूप दुखी होते. ते त्यांना माहित असावे. ते म्हणाले, ‘नाहीतर दिल्लीला येता का माझ्या खात्यात?’ त्यावर मी असमर्थता दर्शविली. मग देशमुखसाहेब म्हणाले, ‘तुम्ही कुठेही गेलात तर चांगलेच काम कराल असा मला विश्वास आहे. अहो, तुमच्यासारखे चांगले काम करणारे अधिकारी सरकारला शोकेसमध्ये ठेवण्यापुरते तरी असावे लागतात.’ त्यांच्या बोलण्याने आणि इतक्या मोठ्या पदावरील व्यक्तीने कामाची पावती दिल्याने मला खूप दिलासा वाटला. मनावर आलेले मळभ निघून गेले.

एकदा मी उत्तर प्रदेशात अभ्यासदौ-यासाठी गेले होते. वाराणसीला मला त्या राज्य सरकारतर्फे एक सुरक्षारक्षक देण्यात आला होता. आमचे मराठी बोलणे ऐकून त्याने विचारले की तुम्ही महाराष्ट्रातून आलात का? मी हो म्हटल्यावर तो म्हणाला, ‘आपके सी.एम. विलासराव भी एक बार यहा आये थे. मैं उनका भी बॉडीगार्ड रह चुका हूं. इतना नेक और दर्यादिल इन्सान मैने कभी नही देखा. क्या आपको उनको जानती हैं?’ त्यावर मी म्हणाले, ‘हां, वोह हमारे सी.एम.साहेब थे. यावर तो म्हणाला, ‘मेरी एक मनशा हैं, अगले महिने में रिटायर होने जा रहा हूं. उससे पहले मुझे उनसे बात करनी हैं. क्या आपके पास उनका नंबर हैं?’ माझ्याकडे साहेबांचा नंबर होता पण फोन करावा की नाही असा क्षणभर संभ्रम वाटला. पण मी फोन केलाच. त्यांनी उचलला. ‘नमस्कार सर, मी श्रद्धा बेलसरे वाराणसीहून बोलतेय.’ ते दिलखुलास हसून म्हणाले, ‘बोला बोला, काय म्हणताय? मग मी म्हणाले, ‘इथल्या एका बॉडी गार्डला तुमच्याशी बोलायची इच्छा आहे असे त्याने सांगितले. ते म्हणाले. ‘द्या, द्या, मलाही त्याच्याशी बोलायचे आहे.’ ते त्याच्याशी बोलले. बॉडी गार्डच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्याला काही खाजगी बोलायचे असेल म्हणून मी थोडी बाजूला जाऊन उभी राहिले. फोन संपल्यावर तो मला म्हणाला, ‘बडी मेहरबानी हुवी, बहेनजी! आपने साबसे हमारी बात करवायी.’ मी सहज विचारले ‘काय विशेष काम होते का?’ त्यावर तो हसून म्हणाला, ‘कुछ काम नही था, ऐसे अच्छे इन्सानसे बात करना बहुत अच्छा लगा.’ दुस-या राज्यातल्या एका पोलीस कर्मचा-याला त्यांच्याबद्दल वाटणारी ही आत्मीयता बघून मलाही खूप आनंद वाटला.

देशमुखसाहेब विरोधी पक्षावर टीका पण फार मिस्कील शब्दात करत असत. राज ठाकरे शिवसेना सोडून बाहेर पडले त्यावेळी ‘सामना’मध्ये “या चिमण्यानो परत फिरा रे” अशा शीर्षकाचा अग्रलेख आला होता. त्यावर टिप्पणी करताना देशमुखसाहेब म्हणाले ‘वाघांच्या चिमण्या कधी झाल्या?’ भाषणात ते नेहमी नर्मविनोदाची पखरण करत.

मुंबई बॉम्बस्फोटांनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. ती माहिती त्यांनी एका पत्रकार परिषदेत अत्यंत दिग्निफाईड पद्धतीने पत्रकारांना दिली. पत्रपरिषद संपवून ते परत जात असताना मी त्यांच्यामागे दारापर्यंत गेले. त्यांनी मागे वळून बघितले तेंव्हा माझी नजरानजर होताच ते म्हणाले, ‘काय निघालात का?’ मी ‘हो’ म्हटले. त्यावर त्याही परिस्थितीत ते हसून म्हणाले, ‘गाडी आहे ना जायला?’ मी मान डोलावली. त्यावर ते म्हणाले, ‘नाही, माझी आता गेलीये म्हणून विचारले!’ माझे डोळे पाणावले.

जनतेच्या सुखदु:खाची अचूक जाण असणारा, सामान्य माणसाचाही फोन घेणारा, हा उमदा नेता अकाली गेला हे महाराष्ट्राचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल आहे!

-श्रद्धा बेलसरे-खारकर
८८८८ ९५९०००

ग्लोबल न्युज नेटवर्क: