विधिमंडळात झालेल्या राड्यानंतर शिवसेनेकडून शिंदे गटातील आमदारांना थेट इशारा

 

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना बुधवारी राज्याच्या राजकीय परंपरेला धक्का देणारी घटना घडली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार एकमेकांना शिवीगाळ करत भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेनंतर राज्यभरातून टीका केली जात असताना आज शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीका करत आक्रमक इशारा दिला आहे.

‘महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक समृद्ध अशी राजकीय परंपरा आहे. पण ही मौलिक परंपरा पायदळी तुडवतानाचे दृश्य बुधवारी साऱ्या जगाने बघितले. सत्तारूढ शिंदे गटाने विधिमंडळाच्या आवारात घडवलेल्या धुमश्चक्रीमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. त्यानंतरही ये तो एक ट्रेलर था, अशी धमकी दिली जात असेल तर शिंदे गट भविष्यात महाराष्ट्राला कोणता ‘पिक्चर’ दाखवण्याच्या तयारीत आहे?’ असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे. तसंच सरकारचा हा गुवाहाटीफेम सिनेमा म्हणा किंवा तमाशा, महाराष्ट्राची जनताच उद्या डब्यात घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ‘सामना’तून देण्यात आला आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. दोन लोकप्रतिनिधीच एकमेकांना भिडल्याचे अभूतपूर्व चित्र महाराष्ट्राला पाहावं लागलं. याबाबत भाष्य करताना शिवसेनेनं म्हटलं आहे की, ‘दोन्ही बाजूंचे एकेरीवर तर आलेच; मग मोठी गुद्दागुद्दीही झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संयमाने परिस्थिती हाताळली म्हणून पुढील भयंकर प्रकार टळला अन्यथा विधिमंडळाच्या आवारात काय घडले असते हे कोणीच सांगू शकणार नाही. असभ्य शब्दांचा वापर, अर्वाच्य शिवीगाळ आणि खेचाखेची व धक्काबुक्कीची ही घटना पाहून विधान भवनाच्या निर्जीव भिंतींनीही नक्कीच अश्रू ढाळले असतील.

Team Global News Marathi: