वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत अजित पवारांचा गंभीर आरोप, त्यात मुख्यमंत्री शिंदेंना लिहिले पत्र

 

मुंबई | वेदांता-फॉक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रातून गुजरात गेल्याच्या आरोपामुळे राजकीय आखाडा तापला असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आहे. फॉक्सकॉन प्रकल्प राजकीय दबावातून गुजरातला नेला आहे. धोलेरा इथं हा प्रकल्प होणार आहे, गुजरातच्या तुलनेत धोलेरात सुविधाच नाहीत असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे.

अजित पवार यांनी फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये अजितदादांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहे. वेदांता ग्रुपचा प्रकल्प गुजरातला होत असल्याने हा प्रकल्प राज्याच्या बाहेर जाऊ देऊ नका अशी मागणीही अजितदादांनी केली. वेदांता ग्रुपचा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा तळेगाव येथे हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातला नेण्यात आला.

तसेच सदर या प्रकल्पामुळे राज्यात १.५ लाख रोजगार निर्माण झाले असते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलगांणा आणि आंध्र प्रदेश या राज्यात चर्चा केली. पण, या कंपनीने तळेगावची जागा निवडली होती. त्यासाठी 1000 एकरची जागा निवडली होती, असा खुलासा अजितदादांनी केला. उद्योग विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने त्यांना बऱ्याच सवलती देण्याचे मान्य केले होते. मात्र, वरिष्ठ राजकीय दबावापोटी ही गुंतवणूक गुजरातला नेण्यात आली. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित आहे, या ठिकाणी तळेगावच्या तुलनेत काहीच नाही, असा दावाही अजित पवारांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकल्प परत महाराष्ट्रात आणावा, अशी विनंती शिंदेंनी केली असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ३० मिनिटे चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये झालेल्या फोनवरील चर्चेत प्रामुख्याने वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात राज्यात गेल्यामुळे तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Team Global News Marathi: