वर्तमानपत्रातील शुभेच्छांच्या जाहिरातीमुळे वानखेडे दाम्पत्य करणार राजकारणात प्रवेश ?

 

ड्रग्ज प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे वेगवेगळ्या कारणांनी नेहमी चर्चेत आहे. सनदी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर या दाम्पत्याच्या एका जाहिरातीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

वाशिममधील वृत्तपत्रात जाहिरात देऊन वानखेडे दाम्पत्याने जिल्ह्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या या शुभेच्छांच्या जाहिरातीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्या होमपीचवर वानखेडे राजकीय डाव खेळणार का, अशी चर्चा या निमित्ताने सुरु झालीय.

वानखेडे दाम्पत्यांनी त्यांचा गृह जिल्हा असलेल्या वाशिम मध्ये स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देत जनतेला आणि बळीराजाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील जनता आणि शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी भरभराटीची जावो अशा आशयाची ही जाहिरात आहे. त्यामुळे वानखेडे दाम्पत्य आपल्या होम पिचवर राजकीय डाव तर साधणार नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे.

समीर वानखेडे काही महिन्यांपूर्वीपर्यंत नार्कोटिक्स ब्यूरोमध्ये मुंबईत उच्चपदस्थ अधिकारी होते. त्यांनी चित्रपट सृष्टीतील अनेकांवर अमली पदार्थ संदर्भातल्या कारवाया केल्या होत्या. आर्यन खान संदर्भातल्या क्रुझवरील कारवाईनंतर समीर वानखेडे यांची नार्कोटिक्स विभागातून दुसऱ्या विभागात बदली देण्यात आली होती. त्याच मुद्द्यावर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांच्यातला वाद न्यायालय आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगापर्यंत पोहोचला होता.

Team Global News Marathi: