यूपी ते मुंबई ; भंगार विक्री ते कॅबिनेट मंत्री समाजवादी पार्टी ते राष्ट्रवादी काँग्रेस – जाणून घ्या नवाब मलिक यांची कारकीर्द

यूपी ते मुंबई ; भंगार विक्री ते कॅबिनेट मंत्री समाजवादी पार्टी ते राष्ट्रवादी काँग्रेस – जाणून घ्या नवाब मलिक यांची कारकीर्द

सुमारे 8 तासांच्या कठोर चौकशीनंतर मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने अटक केली आहे. दाऊद इब्राइम म्हणजेच डी कंपनीशी संबंध असल्याने ते ईडीच्या रडारवर आहेत. सकाळी 7.45 वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती. नवाब मलिक यांच्याकडे ठाकरे सरकारमध्ये अल्पसंख्याक, उद्योग आणि कौशल्य विकास मंत्रिमंडळ खाते आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि पक्षाचे मुंबई शहर अध्यक्ष देखील आहेत. मलिक हे सुरुवातीला भंगार विक्रीचा व्यवसाय करायचे. काही वर्षापूर्वीपर्यंत ते या व्यवसायाशी संबंधीत होते.

उत्तर प्रदेशातील बलरामपूरचे आहे मलिक यांचे कुटुंब
मूळचे उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील नवाब मलिक यांचे कुटुंब शेती करायचे. कुटुंबातील काही सदस्य व्यवसायात गुंतले होते, त्यामुळे संपूर्ण कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. नवाब यांचा जन्म 20 जून 1959 रोजी उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील उत्रौला तालुक्यातील एका गावात झाला.

मलिक कुटुंबाचे मुंबईत हॉटेल होते आणि कुटुंबातील इतर सदस्य भंगार व्यवसायात होते. पत्रकार परिषदेत मलिक म्हणाले होते. ‘होय, मी भंगार विक्रेता आहे. माझे वडील मुंबईत कापड आणि भंगाराचा व्यवसाय करायचे. मी आमदार होईपर्यंत भंगाराचा व्यवसायही केला. माझे कुटुंब आजही तेच काम करते. मला ते आवडते आणि यावर अभिमान आहे.’

पहिल्या लोकसभा निवडणुकीत फक्त 2620 मते मिळाली

नवाब मलिक यांनी 1984 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून गुरुदास कामत आणि भाजपकडून प्रमोद महाजन यांच्याविरुद्ध लढवली होती. त्यावेळी मलिक अवघे 25 वर्षांचे होते. कामत यांनी 2 लाख 73 हजार मते मिळवत प्रमोद महाजन यांचा 95 हजार मतांनी पराभव केला होता. त्या निवडणुकीत मलिक यांना केवळ 2620 मते मिळाली होती. मलिक यांनी संजय विचार मंचकडून निवडणूक लढवली, मात्र त्यांना राजकीय पक्षाचा दर्जा नसल्याने या निवडणुकीत त्यांना अपक्ष मानन्यात आले.

मलिक यांना दोन मुली आणि दोन मुले आहेत
नवाब मलिकांनी 1980 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी मेहजबीन यांच्यासोबत लग्न केले. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. फराज आणि अमीर अशी मुलांची नावे आहेत, तर निलोफर आणि सना अशी मुलींची नावे आहेत. मलिक यांचा व्यवसाय त्यांची मुले व मुली चालवतात.

आपल्या दोन्ही मुलींसोबत नवाब मलिक

विरोधामुळे इंग्रजी शाळा सोडली
मुंबईत आल्यानंतर नवाब मलिकांना सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी दाखल करण्यात आले, परंतु त्यांचे वडील मोहम्मद इस्लाम यांच्या नातेवाईक आणि मित्रांच्या विरोधामुळे ते इंग्रजी शाळेत गेले नाहीत. नंतर नवाब यांना महापालिकेच्या नूरबाग उर्दू शाळेत दाखल करण्यात आले. येथून त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले.

त्यानंतर डोंगरी येथील जीआर क्रमांक 2 शाळेत सातवीपर्यंत आणि सीएसटी विभागातील अंजुमन इस्लाम शाळेत 11वीपर्यंत (तेव्हा मॅट्रिक) शिक्षण घेतले. मॅट्रिकनंतर त्यांनी बुरहानी कॉलेजमधून बारावी पूर्ण केली. त्याच कॉलेजमध्ये त्यांनी बीएला प्रवेशही घेतला, पण कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी बीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली नाही.

विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला
नवाब मलिक कॉलेजमध्ये शिकत असताना मुंबई विद्यापीठाने कॉलेजची फी वाढवली. त्याच्या विरोधात शहरात आंदोलन सुरू होते. नवाब मलिक सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे त्या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांच्या मारहाणीत नवाब जखमी झाले. दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांनी पोलिस आयुक्तांच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. याच काळात त्यांना राजकारणात रस निर्माण झाल्याचे नवाब मलिक सांगतात. 1991 च्या महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेसकडे तिकीट मागितले, परंतु काँग्रेसने त्यांना तिकीट दिले नाही, तरीही नवाब मलिक हे त्यांचे राजकीय स्थान बनविण्याचा प्रयत्न करत राहिले.

मलिक यांनी त्यांचे वर्तमानपत्र काढले
डिसेंबर 1992 मध्ये बाबरीच्या घटनेनंतर मुंबईत दंगल उसळली होती. त्यानंतर सर्वत्र संवेदनशील वातावरण निर्माण झाले होते. यानंतर मलिक यांनी नीरज कुमार यांच्यासोबत मुंबईत ‘सांझ समाचार’ हे वृत्तपत्र सुरू केले, परंतु काही वर्षांनी आर्थिक अडचणींमुळे ते बंद झाले.

 

मलिक हे समाजवादी पक्षातही गेले आहेत
मुंबई आणि आजुबाजूच्या भागात बाबरी मशीद घटनेनंतर मुस्लिम मतदारांमध्ये समाजवादी पक्षाची लोकप्रियता वाढत होती. या लाटेत नवाब मलिक यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिमबहुल नेहरू नगर मतदारसंघातून त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले. त्यावेळी शिवसेनेचे सूर्यकांत महाडिक 51 हजार 569 मते मिळवून विजयी झाले. नवाब मलिक 37,511 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत. मलिक यांचा पराभव झाला, पण पुढच्याच वर्षी ते विधानसभेत पोहोचले. धर्माच्या आधारे मते मागितल्याप्रकरणी आमदार महाडिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केली. त्यामुळे 1996 मध्ये नेहरू नगर मतदारसंघात फेरनिवडणूक झाली. यावेळी नवाब मलिक सुमारे साडेसहा हजार मतांनी विजयी झाले.

 

अशी झाली नवाब मलिक यांची राष्ट्रवादीत एंट्री

1999 च्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक पुन्हा समाजवादी पक्षाकडून विजयी झाले. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली. समाजवादी पक्षाचे दोन आमदार निवडून आले. त्यांनाही आघाडीला पाठिंबा देण्यासाठी सत्तेत वाटा मिळाला. यानंतर नवाब मलिक गृहनिर्माण राज्यमंत्री झाले. राजकीयदृष्ट्या ते खूप चांगले काम करत होते, पण कालांतराने मलिक यांचे समाजवादी पक्षाच्या नेत्यांशी असलेले मतभेद चव्हाट्यावर आले. याला कंटाळून अखेर मलिक यांनी मंत्री असतानाही राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर ते उच्च व तंत्रशिक्षण आणि कामगार मंत्री झाले.

 

अण्णा हजारेंच्या आरोपावरून राजीनामा दिला
2005-06 दरम्यान मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले नवाब मलिक यांना राजीनामा द्यावा लागला होता. माहीमच्या जरीवाला चाळ पुनर्विकास प्रकल्पात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप मलिक यांच्यावर होते. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर चौकशी सुरू झाली आणि नवाब मलिक यांना राजीनामा द्यावा लागला. 12 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने याच खटल्याचा निकाल देताना मलिक यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली.

आर्यन प्रकरणात मलिक यांनी केले अनेक खुलासे

नवाब मलिक हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबावर सातत्याने आरोप करत राहिले आहेत. आर्यन खानला 2 ऑक्टोबर 2021 रोजी अटक करण्यात आली आणि 26 दिवसांनंतर 28 ऑक्टोबर रोजी त्याला जामीन मिळाला. यादरम्यान या संपूर्ण प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मलिक यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. समीर वानखेडे यांच्या जन्मापासून ते लग्न आणि कुटुंबातील तथ्यांपर्यंत अनेक आरोप त्यांनी केले, त्यामुळे समीर वानखेडेंचीही चौकशी सुरू आहे. त्यांना एनसीबीमधूनही माघार घ्यावी लागली आहे. आर्यन खानच्या सुटकेनंतर, मलिक यांच्या ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि 1 नोव्हेंबर रोजी त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचा जयदीप राणासोबतचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले, ‘चला आणि भाजप आणि ड्रग्स पॅडलरच्या नात्यांची चर्चा करुया.’

ग्लोबल न्युज नेटवर्क: