उमेदवारी मिळाली नाही, म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नव्हे

 

कोल्हापूर | छत्रपती घराण्याला सर्वच पक्ष सन्मान देतात. त्यामुळे संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून छत्रपती घराण्याचा अवमान झाला, असे म्हणता येणार नाही, असे शाहू छत्रपती यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना स्पष्ट केले. संभाजीराजेंी निवडणूक अपक्ष लढवावी, ही भाजप आणि त्यातही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच खेळी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

संभाजीराजे यांनी घेतलेली भूमिका, त्यावरून सुरू असलेली चर्चा यासंबंधी शाहू छत्रपती यांनी सडेतोडपणे भूमिका मांडली. ते म्हणाले की, संभाजीराजे यांच्या खासदारकीची मुदत ३ मे रोजी संपल्यावर त्यांनी फडणवीस यांची अर्धा तास भेट घेतली. त्यात काय चर्चा झाली, हे समजले नाही. नंतर लगेच संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना काढण्याची व राज्यसभा निवडणूक अपक्ष लढविण्याची घोषणा केली.

तुम्ही संघटना व पुढे तो राजकीय पक्ष करणार होता, तर मग तुम्हाला राज्यसभेची गरज नव्हती. तुम्हाला राज्यसभा हवी होती, अपक्ष लढायचे होते तर मग फडणवीस यांच्याइतकेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते व त्यांची संमतीही महत्त्वाची होती. कदाचित त्यातून हे गणित जमलेही असते. त्यांना न भेटता, विश्वासात न घेता तुम्ही परस्पर उमेदवारी जाहीर केली.

तुम्हाला वाटले की, मी अपक्ष म्हणून लढणार, असे जाहीर केल्यावर महाराष्ट्रातील सारे पक्ष पाठिंबा जाहीर करायला माझ्या मागून पळत येतील. परंतु, तिथेच त्यांचे गणित चुकले. कदाचित ‘तुम्ही अपक्ष लढा, आम्ही पाठिंबा देतो’, असे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच सुचविले असेल.

Team Global News Marathi: