उद्धव ठाकरे गटातील नेते महेश कोठेंनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ

 

सोलापूर | सोलापूरचे माजी महापौर आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते महेश कोठे मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र सत्तांतर झाल्यानंतर कोठे यांची शिंदे गट, खासकरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक अधिकच वाढत चालली होती. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी महेश कोठेंना थेट पक्षाचे ‘दादा’ म्हणजेच विरोधी पक्षनेते अजित पवारयांच्याकडे घेऊन गेले. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत कोठेंचा राष्ट्रवादीत प्रवेश करुन घेतल्याची माहिती आहे.

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांनी कुणाचीही साथ न घेता स्वत:च्या बळावर महापालिकेतील सर्व पदे भूषवली. शहरात त्यांचे मोठे राजकीय प्रस्थ असल्याने त्यांचा प्रवेश झाला आहे. तसंच आनंद चंदनशिवे, माजी आमदार दिलीप माने हे आमचेच आहेत, असा विश्वास दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले आहे.

दुसरीकडे, बसपामधून नगरसेवक झालेले आनंद चंदनशिवे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली. पण, पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. भरणे आणि संजयमामा शिंदे यासारख्या नेत्यांनी त्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी आग्रह भूमिका घेतली आहे. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात असला तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडून त्यांना ठोस आश्वासन हवे असल्याची चर्चा आहे.

Team Global News Marathi: