उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर शिवसेना शाखेबाहेर फासलं काळ

 

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले असून ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेच्या दोन गटात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. यातच आता ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील चंदनवाडी शाखेच्या बाहेर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवर काळं फासल्याची घटना घडली आहे. ठाण्यात घडलेल्या या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, चंदनवाडी येथील शिवसैनिकांनी रात्री उशिरा शाखा बंद केली आणि ते आपआपल्या घरी गेले. मात्र, त्यानंतर काही तरूण तिथे आले आणि त्यांनी शाखेबाहेर लावलेल्या बॅनरच्या मजकुरावर काळा रंग फासून पोबारा केला. काळं फासण्यासाठी आलेले तरुण हे मोटारसायकलवरून आले आणि नंतर लगेच पळून गेले, अशी माहिती शिवसैनिकांनी दिली.

Team Global News Marathi: