उद्धव ठाकरेंच्या मालमत्तेची चौकशी सुरू झाल्यावर गौरी भिडे म्हणाल्या

 

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या मालमत्तेची प्राथमिक चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू झाली आहे. राज्य सरकारने याबाबत हायकोर्टात माहिती दिली आहे. गौरी भिडे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली होती, त्याचीच दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी हायकोर्टात दिली.

गौरी भिडे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर राज्य सरकारने स्वत:हून कोर्टापुढे स्पष्टीकरण दिलं. राज्य सरकारच्या भूमिकेची हायकोर्टाने नोंद घेतली.

गौरी भिडे यांच्या याचिकेवरचा निकाल हायकोर्टाने अद्याप राखीव ठेवला आहे. न्यायमूर्ती डी.सी.ठाकूर आणि न्यायमूर्ती व्ही.एस.मेनेझेस यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवरची सुनावणी झाली. उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप गौरी भिडे यांनी त्यांच्या याचिकेत केला. तसंच ठाकरे आणि कुटुंबाच्या मालमत्तेची ईडी किंवा सीबीआयकडून चौकशी करा, अशी मागणीही गौरी भिडे यांनी केली आहे.

काय म्हणाल्या गौरी भिडे?

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेची प्राथमिक चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू असल्याचं राज्य सरकारने कोर्टात सांगितलं, यानंतर गौरी भिडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ’11 जुलै रोजी दिलेल्या फौजदारी तक्रारीची प्राथमिक चौकशी नुकतीच सुरू झाल्याची माहिती सरकारने 151 दिवसांनी कोर्टात दिली. आपण अर्धी लढाई जिंकली आहे, आता कोर्टाच्या आदेशाची वाट पाहू,’ असं गौरी भिडे म्हणाल्या.

 

Team Global News Marathi: