उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर शरद पवारांचं मौन

 

२०१९ प्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार तितक्याच नाट्यमयरीत्या सत्तेतून बाहेर गेले आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीबाबत दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मविआ सरकारची अखेर झाली. मात्र या सर्व घडामोडी घडत असताना महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची कुठलीही प्रतिक्रिया अद्यापपर्यंच समोर आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

शिवसेनेच्या काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करून महाराष्ट्रातून पलायन केल्यानंतर शरद पवार यांनी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत या प्रकरणापासून स्वत:ला दूर केले होते. त्यानंतर मात्र संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठका झाल्यावर शरद पवार सक्रिय झाले होते. तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेही बंडखोरांना आव्हान देण्यासाठी सज्ज झाले होते. पण शेवटच्या एक दोन दिवसांत शरद पवार या सर्व घडामोडींपासून अलिप्त दिसले.

राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यावर शरद पवारांकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. तसेच सोशल मीडियावरही त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतर रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीचं कौतुक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. मात्र उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतरही शरद पवार यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

त्यातच उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार असल्याची कल्पना शरद पवार यांना नव्हती, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जयंत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार असल्याची माहिती शरद पवार यांना होती, असं मला वाटत नाही. त्यांनी राजीनामा दिल्याचं आम्ही टीव्हीवर पाहिलं. त्यांनी आधी तसे सूतोवाच केले होते का हे मला माहिती नाही. मी शरद पवारांसोबतच टीव्ही पाहत होतो. उद्धव ठाकरेंचं भाषण पाहून आम्हाला ते राजीनामा देणार असल्याचं कळलं, असे जयंत पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: