जे सन्मानाने झालं असतं ते घातपाताने का केलं, उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल

जे सन्मानाने झालं असतं ते घातपाताने का केलं, उद्धव ठाकरे यांचा भाजपला  सवाल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला आहे. ”जे अडीच वर्षापूर्वी सन्मानाने झालं असतं ते असं घातपाताने का केलं’, असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेतून केला आहे.

”अडीच वर्षापूर्वी भाजपने घात केल्यामुळे महाविकास आघाडीचा जन्म झाला. आज जे काही त्यांनी घडवलं आहे ते त्यांनी अडीच वर्षापूर्वी केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं. आणि जे काही खर्चाचे आकडे येत आहेत. ते फुकटात झालं असतं. जी गोष्ट सन्मानाने झाली असती तरी घातपाताने का केली. व जी गोष्ट दिलदारपणाने झाली असती ती एवढा खर्च करून त्रास घेऊन का केली. हे असे खेळ करत बसण्यापेक्षा निवडणूका घ्या. विधानसभेच्या निवडणूका व्हायला हव्या. जर आम्ही चूक केली असेल तर जनतेचा निर्णय आम्हाला शिरसावंद्य आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

काही बंडखोर आमदारांनी मातोश्रीने सन्मानाने बोलवलं तर भाजपशी चर्चा केली तर नक्की परत जाऊ, आमचं उद्धव ठाकरेंवर प्रेम आहे अशी वक्तव्यं केली होती. त्याविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले ”सुरतेला जाण्यापेक्षा मला सुरत दाखवली असती तर एवढे पर्यटन घडलेच नसते.

काही लोकं जी आतापर्यंत गप्प होती ती आता तिथे जाऊन बोलती झाली आहेत. या लोकांना मातोश्रीबद्दल प्रेम आहे. उद्धव ठाकरे आदित्यबद्दल प्रेम आहे असे ते सांगतात. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आहे. धन्य झालो मी ते ऐकून. जे प्रेम तुम्ही आता दाखवताय. पण गेली अडीच वर्ष जी लोकं मातोश्रीबद्दल, माझ्याबद्दल, माझ्या घराण्याबद्दल, आदित्यबद्दल अश्लाघ्य व विकृत भाषेत टीका करत होते. त्यावेळी का यापैकी कुणाची दातखिळी उचकटली नव्हती.

यांच्यातील एकानेही त्यांना विरोध होईल असं बोलला नव्हता. ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आहात, त्यांना भेटता आहात, मिठ्या मारता आहात. मग हे प्रेम तुमचं खरं आहे की तकलादू आहे? ज्यांनी ठाकरे कुटुंबीयांचा अपमान केला, हिणवलं, माझ्या मुलांना आयुष्यातून उठविण्या पर्यंत ज्यांचे प्रयत्न चालले होते. अशा लोकांसोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसता आहात तर हे प्रेम खरं की खोटं हे देखील जनतेला कळू द्या. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही. त्यामुळे पुढे काय होणार असे अनेक प्रश्न आहेत. मात्र जनतेला एकाच प्रश्नाचं उत्तर हवं आहे. एवढं सगळं देऊन सुद्धा असं का वागलात?”

ग्लोबल न्युज नेटवर्क: