उद्धव ठाकरे रुग्णालयात, एसटी कर्मचाऱ्यांनी थोडा विचार करावा

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागच्या २ आठवड्यापासून आंदोलन करत असून या आंदोलनात आता भाजपा नेते सुद्धा उतरले आहे. त्यातच आता माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटेनचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे एसटी कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात उतरले आहे तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचा विचार करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.

ग्रामीण भागातील प्रवासी अडचणीत सापडले आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. खाजगी वाहतूकदार प्रवाशांची पिळवणूक करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे छोटे ऑपरेशन झाल्यामुळे ते रुग्णालयात आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी चुकीची भूमिका न घेता जरा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात एका शासकीय कार्यक्रमानिमित्त ते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले.

अब्दुल सत्तार म्हणाले, एसटी सुरू होणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करू नये. हा वाद एसटी कामगार आणि सरकारमध्ये आहे. सरकार मध्यस्थी करून जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत संपात तेल टाकण्याचे काम करत आहे.

Team Global News Marathi: