बॉम्बे हायजवळच्या समुद्रात दोन मोठी जहाजे भरकटली नौदलाच्या दोन युद्धनौका दोन मालवाहू जहाजांच्या मदतीला

बॉम्बे हायजवळच्या समुद्रात दोन मोठी जहाजे भरकटली
नौदलाच्या दोन युद्धनौका दोन मालवाहू जहाजांच्या मदतीला

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा बसत दोन मोठी मालवाहू जहाजे (barges)मुंबईजवळच्या समुद्रात (Arabian Sea) भरकटली आहेत. या दोन्ही जहाजांवर मिळून एकूण ४१० खलाशी आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे देशाची पश्चिम किनारीपट्टी ढवळून निघाली आहे. यात मुख्यत: कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला मोठा तडाखा बसला आहे. तौक्ते चक्रीवादळ जोरदार घोंगावत महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडून दिशा बदलत गुजरातच्या किनाऱ्याकडे निघाले आहे.

 

‘P305’या मालवाहू जहाजाकडून मदतीचा संदेश बॉम्बे हाय जवळच्या समुद्रात मिळाल्यानंतर आयएनएस कोची (warship INS Kochi)ही युद्धनौका शोध आणि मदत मोहिमेवर निघाली, अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली आहे. बॉम्बे हायचे तेलशुद्धीकरण प्रकल्प हे मुंबईच्या नैऋत्येस ७० किलोमीटर अंतरावर आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मोठे संकट निर्माण करणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरण्यासाठी मानवी मदतीसाठी आणि आपत्कालीन मदतीसाठी अनेक जहाजे तयार ठेवण्यात आली आहेत.

१३७ खलाशी असलेल्या ‘जीएएल कन्स्ट्रक्टर’ (GAL Constructor) या दुसऱ्या एका मालवाहू जहाजावरून मदतीचा संदेश मिळाल्यानंतर आयएनएस कोलकाता (warship INS Kolkata)ही युद्धनौका तातडीने त्या जहाजाच्या मदतीसाठी रवाना झाली.

 

हा संदेश मुंबईपासून ८ नॉटिकल मैलांवरून आला होता, अशी माहिती पुढे नौदलाच्या प्रवक्त्याने दिली आहे. यातील एका जहाजावर २७३ खलाशी आहेत तर दुसऱ्या जहाजावर १३७ खलाशी आहेत. ही जहाजे बॉम्बे हायच्या हिरा ऑईल फिल्डमध्ये अरबी समुद्रात काम करत होती. तौक्ते वादळामुळे ही जहाजे भरकटली होती. नौदलाने मदतीचा संदेश मिळाल्याबरोबर युद्धनौका मदतीसाठी पाठवल्या होत्या.

महाराष्ट्रातून तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने

सोमवारी सकाळी तौक्ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळून घोंगावत जात असताना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत बंद करण्यात आले होते. रायगड जिल्हा आणि जवळच्या परिसरात रेड अलर्ट जाहीर करण्यात आले होते तर मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले होते.

 

मुंबईतील मोनोरेल सेवा एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर घाटकोपर आणि विक्रोळी या उपनगरातील मध्य रेल्वेची सेवा बंद पडली होती. वादळी वारे, जोरदार पाऊस आणि भरतीच्या उंच लाटा यामुळे महाराष्ट्राची आणि गोव्याची किनारपट्टी यांना तौक्ते चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला. त्यानंतर तोक्ते चक्रीवादळाने आपली दिशा बदलत गुजरातच्या दिशेने वाटचाल केली.

गुजरातच्या किनारपट्टीवर पोचताना तौक्ते चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्रातून पुढे वाटचाल करत तौक्ते चक्रीवादळ उत्तर आणि वायव्य दिशेस ताशी २० किमीच्या वेगाने पुढे सरकले आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: