‘तुमच्यावर थुंकणेच काय ते बाकी ठेवले’, शिवसेनेची शिंदे गटावर खरमरीत टीका

 

मुंबई | तर काय म्हणे बेइमानांचा गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणार आणि त्यांनाच तो अधिकार आहे. या दळभद्री प्रकाराबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने फक्त तुमच्यावर थुंकणेच काय ते बाकी ठेवले’ असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली.दसरा मेळाव्याच्या मुद्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार राडा पाहण्यास मिळाला. अखेरीस शिवतीर्थावर शिवसेनेला परवानगी मिळाली. आता याच मुद्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे.

चार दिवसांपूर्वीच (उप) मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते, ”मला संपविण्याचे खूप प्रयत्न शत्रूंनी केले, पण मी संपलो नाही.” राजकारणात कोणी संपत नसतो. शिवसेनेचेही तसंच आहे गेल्या ५६ वर्षांत शिवसेनेला संपविण्यासाठी काय कमी प्रयत्न झाले? पण शिवसेना प्रत्येक वेळी नव्या जोमाने आणि तेजाने उसळून वर गेली. त्यामुळे गेल्या दोन-चार महिन्यांत फडणवीस व त्यांच्या पक्षाने शिवसेना संपविण्याचे जे प्रयत्न सुरू केले, ४० बेइमान लोकांच्या मदतीने जे कारस्थान रचले गेले, त्यामुळे शिवसेना संपेल या भ्रमात त्यांनी राहू नये.

शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या पाठीत खुपसलेले खंजीर पचवले व ते पुढे गेले. त्याच मार्गाने आम्ही पुढे जात आहोत’ असं म्हणत सेनेनं फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं.’चाळीस बेइमानांची शिवसेना म्हणे खरी, त्या बेइमानांच्या शिवसेनेशी कमळाबाईची युती आहे, असे शंभरदा रेटून बोलल्याने महाराष्ट्राची जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल, असे वाटत असेल तर तो भ्रम आहे. काय तर म्हणे बेइमानांचा गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणार आणि त्यांनाच तो अधिकार आहे. या दळभद्री प्रकाराबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने फक्त तुमच्यावर थुंकणेच काय ते बाकी ठेवले’ अशी जळजळीत टीकाही सेनेनं शिंदे गटावर केली.

दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची परंपरा शिवसेनेचीच आहे. फडणवीसांचे ‘मिंधे’ गोधड्या भिजवत होते तेव्हापासून शिवसेनाप्रमुख शिवतीर्थावरून विचारांचे सोने विजयादशमीस उधळत आले आणि त्याच दिशेने महाराष्ट्र व देश पुढे गेला. त्या बाळासाहेबांनाच आव्हान देण्याइतपत बेइमानांची मजल गेली ती फक्त कमळाबाईच्या नादी लागल्याने खऱ्या-अस्सल शिवसेनेचा नाद करायचा नाही व कमळाबाईच्या नादास जो लागला त्याचा कार्यभाग संपला हे जर मिंध्यांना कळत नसेल तर त्यांच्या बेइमान गटाने स्वतःच्या सर्वनाशाला आमंत्रण दिले आहे हे नक्की, असा टोलाही सेनेनं शिंदे गटाला लगावला.

Team Global News Marathi: