तुमच्या प्रभागाच्या नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक, महापालिकेच्या संकेतस्थळावर कामांची माहिती उपलब्ध

 

नगरसेवक आपापल्या विभागात केलेल्या कामांची माहिती वार्षिक कार्य अहवाल प्रकाशित करून मतदारांसमोर ठेवत असतात. मात्र, यातील माहिती किती खरी, किती खोटी याची शहानिशा सर्वसामान्यांना करता येत नाही.
त्या पार्श्वभूमीवर, आता मुंबई महापालिकेने आपल्या संकेतस्थळावर नगरसेवकाने केलेली कामे, त्याचा खर्च आणि कंत्राटदार कोण याची सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली आहे.

मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असून आरोग्य, शिक्षण, पाणी या मूलभूत सुविधांसह रस्ते अशा पायाभूत सुविधाही माफत दरात पुरवत असते. महापालिकेच्या 24 वॉर्डात मुंबईकरांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी नगरसेवकांना योग्य तो निधीही महापालिका उपलब्ध करून देत असते.

महापालिका निवडणूक तोंडावर आली असून त्या पार्श्वभूमीवर, सर्व पक्षांचे नगरसेवक आपल्या पाच वर्षांच्या कामाचे प्रगतीपुस्तक सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, आपापल्या परिसरातील नगरसेवकांनी केलेल्या कामांची शहानिशा करण्यासाठी मुंबईकरांना महापालिकेने संकेतस्थळावर सर्व नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक उपलब्ध करून दिले आहे.

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी केलेल्या 24 वॉर्डमधील 227 प्रभागांमधील कामांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे स्वयंसेवी संस्थांकडून केली जात होती. त्याला प्रतिसाद देत महापालिकेने नगरसेवकांचा लेखाजोखा आता संकेतस्थळावर मांडला आहे.

यात नगरसेवकांच्या कामाच्या खरेदी आदेश (पर्चेस ऑर्डर)ची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, प्रभागनिहाय खरेदी आदेश संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यास मुंबईकरांना नगरसेवकांचे मूल्यमापन करणे, अधिक सोपे जाईल, अशी मागणी नागरिकायन संस्थेचे समन्वयक आनंद भंडारे यांनी केली आहे.

Team Global News Marathi: