पावसाळ्याच्या निम्म्यावर पुणे जिल्ह्यातील ही पाच धरणे भरली 100 टक्के

पुणे; धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस बरसल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. पुणे जिल्ह्यातील काही धरणे भरण्याच्या मार्गावर आहे. सध्या सहा धरणे शंभर टक्के भरली असून, १५ धरणांतून कमीअधिक प्रमाणात विसर्ग सुरू आहे. तर गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण १५०.८६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यात उजनी धरणातील पाणीसाठ्याचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात जूनमध्ये ५ ते २० जून त्यानंतर ७ जुलै ते आतापर्यंत बहुतांशी भागात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. यामुळे पश्‍चिम भागात अनेक ठिकाणी मुसळधार, तर पूर्व भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, आंध्रा, वडिवळे, गुंजवणी, नीरा देवघर, वीर, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी या धरणांतून पाण्याचा विसर्ग मुळा व भीमा, कऱ्हा, नीरा, मुठा, पवना, आरळा, इंद्रायणी नद्यांत सोडण्यात आला होता. त्यामुळे नद्या काही प्रमाणात दुथडी भरून वाहत होत्या. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.

 

पानशेत, खडकवासला, कळमोडी, चासकमान, आंध्रा, नीरा देवघर ही धरणे १०० टक्के भरली आहेत. तर टेमघर, वरसगाव, पवना, कासारसाई, भामाआसखेड, वडिवळे, गुंजवणी, भाटघर, वीर, येडगाव, डिंभे ही धरणे ८० ते ९९ टक्के दरम्यान भरली आहेत. तर शेटफळ, नाझरे, माणिकडोह, वडज, चिल्हेवाडी, विसापूर या धरणांत ८० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: