राज्यातील थंडीत वाढ होणार; अवकाळीनंतर हवामानात मोठा बदल

पुणे – राज्यातील ढगाचे मळभ दूर झाले आहे. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात थंडी वाढली आहे. येत्या काही दिवस थंडी किंचित राहणार आहे. शनिवारी (ता.20) सकाळी आठ वाजेपर्यत मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे ८.८ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

राज्यात आकाश निरभ्र झाल्याने उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह पुन्हा काही प्रमाणात सुरू होईल. त्यामुळे किमान तापमानात चढउतार होईल. गेल्या आठवडाभर ढगाळ वातावरणाणुळे थंडी काहीशी कमी होऊन किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या वर गेला होता. मात्र, आता राज्यातील काही भागात पुन्हा थंडी वाढू लागली आहे.

मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी थंडीत किंचित वाढल्याने किमाना तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. उस्मानाबाद शहरापाठोपाठ निफाड येथे १०.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले.

कोकणातील काही भागात अंशत ढगाळ वातावरण असल्याने थंडी चांगलीच कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात थंडी असल्याने किमान तापमान १० ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

दरम्यान, मराठवाड्यातही गारवा असल्याने किमान तापमान ८ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातील सर्वच भागात थंडी वाढली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यत घट झाली आहे. या भागात किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: