पालकमंत्र्यांची घोषणा नाही, 19 जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण अधिकार दिले या मंत्र्यांना ; सरकारने केली नावं जाहीर

पालकमंत्र्यांची घोषणा नाही, 19 जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण अधिकार दिले या मंत्र्यांना ; सरकारने केली नावं जाहीर

मुंबई, 11 ऑगस्ट : 30 जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाची शपथ घेतली, यानंतर 39 दिवसांनी 9 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारामध्ये भाजपचे 9 आणि शिंदे गटाच्या 9 अशा एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अजूनही खातेवाटप झालेलं नाही, तसंच पालकमंत्र्यांचीही घोषणा झालेली नाही.

पालकमंत्र्यांची घोषणा झालेली नसल्यामुळे स्वातंत्र्य दिनाला जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. पण आता सरकारने 35 जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करेल, याची अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांपैकी 19 जिल्ह्यांमध्ये शपथ घेतलेले मंत्री 15 ऑगस्टला ध्वजारोहण करतील, याशिवाय उरलेल्या जिल्ह्यांमध्ये तिथले जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.

ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर केल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला आणि पालकमंत्र्यांच्या घोषणेला वेळ लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 17 ऑगस्टपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाआधी सरकारला खातेवाटप करावं लागेल, अन्यथा विरोधक सरकारला धारेवर धरतील हे मात्र निश्चित आहे.

 

मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार आहे याची यादीच प्रसिद्ध केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी होणाऱ्या शासकीय ध्वजारोहणात झेंडावदन करणार असून, सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरमध्येही झेंडावंदन करणार आहेत. चंद्रकांत पाटील पुणे, राधाकृष्ण विखे-पाटील अहमदनगर, गिरीश महाजन नाशिक, दादाजी भुसे धुळे, गुलाबराव पाटील जळगाव, रवींद्र चव्हाण ठाणे, मंगलप्रभात लोढा मुंबई उपनगर, दीपक केसरकर सिंधुदुर्ग, उदय सामंत रत्नागिरी, अतुल सावे परभणी, संदीपान भुमरे औरंगाबाद, सुरेश खाडे सांगली, विजयकुमार गावित नंदुरबार, तानाजी सावंत उस्मानाबाद, शंभूराज देसाई सातारा, अब्दुल सत्तार जालना, संजय राठोड यवतमाळ अशा पद्धतीनं संबंधित मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यांतील झेंडावंदनाचे अधिकार देण्यात आलेत. तर इतर जिल्ह्यांतील झेंडावंदनाचे अधिकार हे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यात विभागीय आयुक्त तर कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशीम, बुलढाणा, पालघर आणि नांदेड  येथे संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील.

ग्लोबल न्युज नेटवर्क: