‘…तेव्हा मी लगेच पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन केला…’; अजित पवारांची २० लाख खंडणी प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया

 

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अतुल गोयल यांना वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता.परंतु पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत सहा जणांना अटक केली. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील सर्किट हाउस या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी गृहमंत्र्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले.

अजित पवार म्हणाले, माझ्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार घडल्याचे माझ्या कानावर आले आहे. ज्या अतुल गोयला खंडणीसाठी फोन गेला होता तो मला ओळखतो. अतुल गोयलला माहीत आहे की, मी ज्यावेळी फोन करतो तेव्हा पलिकडच्या बाजूला प्रायव्हेट नंबर येतो. परंतु आरोपींनी सॉफ्टवेअरचा वापर केल्यामुळे तिकडे माझं नाव गेलं, यामुळे अतुलला संशय आला आणि त्यांनी मला हा प्रकार कळवला.

तसेच माझ्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्याबरोबर मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना संपर्क साधला. तेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे देखील माझ्यासोबत होते. त्यानंतर आम्ही सायबर पोलिसांना याविषयीची माहिती दिली. सायबर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करून सहा लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन त्याद्वारे त्यांचा पी ए बोलत असल्याचे भासवून एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून २० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा व त्यातील २ लाख रुपये स्विकारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने सापळा रचून ६ जणांना अटक केली आहे.

Team Global News Marathi: