अहमदाबाद: भारतात गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना घडली. गांधीनगरच्या पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुरुवारी तक्रार दाखल झाली. समलिंगी असल्याचे इतर कोणालाही सांगितले तर जीव घेईन, अशी धमकी पतीकडून मिळाल्याची तक्रार पत्नीने पोलीस ठाण्यात केली. तक्रार नोंदवून घेणारे पोलीसही या घटनेने सुरुवातीला चक्रावले होते.
ही घटना घडली गुजरातच्या अहमदाबादपासून जवळ असलेल्या गांधीनगरमध्ये गांधीनगर येथील एका प्रतिष्ठीत संस्थेत ग्रंथपालपदी नोकरी करत असलेली ३२ वर्षांची महिला गांधीनगरच्या सेक्टर तीनमध्ये वास्तव्यास आहे. या महिलेने पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार नोंदवली.
अहमदाबादच्या नवरंगपुरातील कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून नोकरी करत असताना ती प्रेमात पडली. सप्टेंबर २०११ मध्ये लग्न झाले. वर्षभर पतीचे वागणे व्यवस्थित दिसत होते. नंतर हळू हळू पत्नीला पतीच्या वागण्याचा संशय येऊ लागला. संशयापोटी तिने एक दिवस पतीच्या मोबाइलमधील काही चॅट तपासले. हे चॅट बघताच पतीचे काही तरुणांशी समलैंगिक संबंध असल्याचे असल्याचे तिच्या लक्षात आले. हा प्रकार समजल्यावर तिला धक्का बसला. या धक्क्यातून सावरल्यावर तिने सर्वात आधी थेट पतीला जाब विचारण्याचा निर्णय घेतला.
पत्नीने रोखठोक सवाल करताच पतीने पुरुष आवडतात पण सामाजिक दबावापोटी तुझ्याशी लग्न केले असे सांगितले. तुला नोकरी आहे, कमावती आहेस म्हणून तुझ्याशी लग्न केले; असेही तो म्हणाला. हे ऐकल्यानंतर पत्नीने स्वतःला सावरले. पुढचे काही दिवस ती हळू हळू त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती. त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होती. पण या प्रयत्नात ती सपशेल अपयशी झाली.
या दरम्यान नोकरीच्या ठिकाणी त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका सहकाऱ्यासोबतच त्याने समलैंगिक संबंध ठेवले. हा प्रकार उघड झाल्यावर संस्थेने त्याला कामावरुन काढून टाकले. नोकरी गेल्यावर तो घरीच होता. घरात बसल्या बसल्या तो मुलांना फोन करायचा. त्यांना घरी बोलवायचा. हे प्रकार वाढू लागले. अखेर महिलेने डिसेंबर २०१९ मध्ये पतीचे घर सोडून कायमचे माहेरी जाण्याचा निर्णय घेतला.
यानंतर तिने पतीविरोधात फसवणूक केल्याची तक्रार केली. लग्नाआधी समलैंगिक संबंधांविषयी माहिती दिली नाही आणि माझ्या आयुष्याचे नुकसान केले, मनस्ताप दिला अशा स्वरुपाची फसवणुकीची तक्रार पत्नीने पतीविरोधात केली. पोलिसांत जाऊ नये यासाठी पती जीवे मारण्याची धमकी देत असल्याचेही पत्नीने सांगितले.
गांधीनगर महिला पोलीस ठाण्यात पतीविरोधात पत्नीने दिलेल्या माहितीआधारे तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणी तपास सुरू असून कायदेशीर कारवाई होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. पत्नीने कायदेशीर सल्ला घेतला असून पतीविरोधात न्यायालयात आपली बाजू मांडण्याची तयारी केली आहे.