देशाचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कोणामध्ये असेल तर ती शरद पवार साहेबांमध्येच – संजय राऊत
ग्लोबल न्यूज | सध्या शेतकरी आंदोलनामुळे देशभरात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच दिल्ली मध्ये अनेक राजकीय घडामोडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी निवड होण्याचं वृत्त सगळीकडे पसरलं आहे.
विरोधी पक्षांची सूत्रे शरद पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता युपीएमधील काही नेत्यांनी वर्तवली आहे. तसे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भक्कम पर्याय म्हणून शरद पवार यांना एकमताने पंतप्रधानपदाच्या दाव्यासाठी समोर आणलं जाईल अशी शक्यता काही काँग्रेस नेत्यांच्या मागणीमुळे निर्माण झाली आहे.
दरम्यान, हे वृत्त पसरताच राज्यातील विविध नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. महाराष्ट्रात भाजपला चकवा देत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात शरद पवार यांच्यासोबतच महत्वाचा वाटा असलेले शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील या विषयावर भाष्य केलं आहे.
यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यावर आपले काय मत आहे, असे विचारले असता असा काही निर्णय झाल्यावरच मी मत व्यक्त करेन, असे राऊत म्हणाले. त्याचवेळी राऊत यांनी पवारांच्या नेतृत्वाची तोंडभरून स्तुती केली. शरद पवार हे देशातील एक प्रमुख नेते आहेत. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता पवार यांच्यात आहे. दांडगा अनुभव, देशाच्या प्रश्नांची जाण आणि खंबीरपणा या सर्वच गोष्टी पवार यांच्याकडे आहेत, असे राऊत म्हणाले.
‘राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कोणामध्ये असेल तर ती शरद पवार साहेबांमध्ये आहे.’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. यासोबतच, ‘भविष्यात राष्ट्रीय राजकारणात काय होईल हे मी सांगू शकत नाही. मात्र, देशभरातील विरोधकांची इच्छा आहे महाराष्ट्रातील प्रयोग भविष्यात देशपातळीवर करावे’ असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.