ठाकरे सरकार आम्हाला विश्वासात घेत नाही, फडवणीसांची टीका

ठाकरे सरकार आम्हाला विश्वासात घेत नाही, फडवणीसांची टीका

महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारने बलात्कार, हत्या, ऍसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेला दिशा कायद्याला राज्य मंत्रिमंडळींच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात मान्यता देण्यात आली. या कायद्यानुसार बलात्काराच्या गुन्ह्यात १५ दिवसात फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. मात्र शक्ती कायद्याच्या चर्चेसाठी अपुरा वेळ मिळत असल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “शक्ती कायद्यासंदर्भात व्यापक चर्चा झाली पाहिजे. सरकारने केवळ एका दिवसाच्या अधिवेशनात इतका महत्त्वाचा कायदा मांडला आहे. कायदा फारच विस्तृत आहे, त्यामुळे कायद्यावर नीट चर्चा न होता कायदा मंजूर झाला तर त्याची परिणामकारकता कमी होईल. या सरकारने विरोधकांना कधीही विश्वासात घेतलं नाही. या सरकारला चर्चा करण्यात रस नाही. चर्चा न करता कामकाज उकरणं हीच या सरकारची कार्यपद्धती आहे”, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

 

“शक्ती कायद्याचा मसुदा संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावा अशी मागणी आम्ही केली आहे. जर सरकारला या कायद्याचा अहवाल संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचा नसेल, तर हा कायदा पुढच्या अधिवेशनात चर्चेत आणावा. पण या कायद्यावर व्यापक चर्चा व्हायलाच हवी. कारण चर्चेविना कायदा मंजूर झाला तर ते योग्य ठरणार नाही”, असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: