“बहुत हुई महंगाई की मार” असे आश्वासन देणाऱ्या सरकारविरोधात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

पुणे | “बहुत हुई महंगाई की मार ……” असे आश्वासन देत भारतीय जनता पक्षाने केंद्रात २०१४ रोजी सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर सत्तारुढ पक्षाने आपल्या आश्वासनाचे पालन न करता गेल्या सात वर्षांत गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली. परिणामी, आधीच कोरोना त्यात इंधन दरवाढीमुळे सामनात नागरिकांच्या घराचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कोथरुड विधानसभा मतदारसंघच्या वतीने गॅस, पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किंमतींबद्दल केंद्र सरकारच्या निषेधार्थ कोथरुड-कर्वे पुतळा येथे मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना संसर्ग लक्षात घेता सामाजिक अंतराचे पालन करत आंदोलन केले होते. यापूर्वी काँग्रेसने सुद्धा इंधन दरवादीविरोधात संपूर्ण राज्यभरात आंदोलन केले होते.

पुण्यामध्ये सोमवारी पेट्रोलच्या दरांनी शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. डिझेलचे दर नव्वद रुपयांच्या पुढे गेले आहेत. वाढत्या इंधन दरांमुळे पुणेकरांच्या खिशावरील भार वाढल्याने महागाईत आणखी वाढ होण्याचा धोका आहे. गेल्या आठवड्यात मुंबई आणि नागपूर या दोन शहरांतील पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे पोहोचले होते. त्यानंतर सोमवारी पुण्यातील पेट्रोलचे दरांनीही शंभरीचा टप्पा गाठला. सोमवारी पुण्यात पेट्रोलचा दर १०० रुपये १५ पैसे होता, तर प्रीमियम पेट्रोलचा दर (पॉवर, स्पीड) १०३.८३ रुपये होता. डिझेल प्रतिलिटर ९०.७१ रुपयांवर गेले.

Team Global News Marathi: