लंडन : युरोपमध्ये कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला असून ब्रिटननेही येत्या गुरुवारपासून महिनाभरासाठी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रान्स, जर्मनीसह काही देशांनी याआधीच दुसऱ्यांदा कडक लॉकडाऊन अंमलात आणला आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांवर पोहोचली असून सध्या तिथे रोज २० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. युरोपमध्ये दुसऱ्या लाटेत ४४ देशांमध्ये गेल्या गुरुवारी २ लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडले होते. दुसऱ्या लाटेमुळे भीषण संकट ओढविण्याची चिन्हे दिसू लागल्याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. ब्रिटनमध्ये कोरोना बळींची संख्या सध्या ४६ हजार आहे.
ती दुसऱ्या लाटेत ८० हजार किंवा त्याहीपेक्षा अधिक होऊ शकते असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. ब्रिटनमध्ये लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, शाळा व विद्यापीठे सुरू राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता पब, रेस्टॉरंट व अन्य सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
लॉकडाऊन जाहीर करताना पीएम जॉन्सन म्हणाले की आता याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता प्रत्येकाला लॉकडाऊन घेऊन घरी रहावे लागेल. केवळ शिक्षण, काम, वैद्यकीय आणि इतर विशेष कारणांमुळे एखादी व्यक्ती घराबाहेर पडू शकते. लॉकडाउनच्या घोषणेबरोबरच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले की, राष्ट्रीय लॉकडाऊन महिन्याभरात इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल सामने सुरू राहतील.
जर्मनी, स्पेन यांसारख्या देशांमध्येही कोरोनाचा पुन्हा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. स्पेनच्या मॅद्रिद या शहरातही अशाच प्रकारे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच पोर्तुगालमध्येही नव्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नव्या नियमांसह त्याची अंमलबजावणी 4 नोव्हेंबरपासून होणार आहे. युरोपातील अन्य काही देशांमध्येही याच प्रमाणे पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्यासंंबंधी चर्चा सुरू आहेत.
कोरोनाची लस येण्यास अद्याप बराच कालावधी लागणार आहे. लशीसंदर्भातील अनिश्चितता अद्याप कायम आहे. तोपर्यंत ठिकठिकाणी समांतर लसीकरण तसेच पर्यायी औषधांवर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच कोरोनाची लाट पुन्हा आल्यास येणारा काळ आव्हानात्मक असणार आहे.
जगभरात कोरोनाची दुसरी लाट?
युरोपीय देशांमध्ये मागील काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये काही रुग्णांना एकदा बाधा झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातूनच हा विषाणू म्युटेट (विकसित रुप) होत असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून भारताच्या तुलनेत पश्चिमी देशांमध्ये मृत्यूदर अधिक होता. तसेच युरोपातही बळी जाणाऱ्यांची संख्या स्थानिक लोकसंख्येच्या जास्त प्रमाणात होती. यानंतर आता कोरोनाची दुसरी लाट येत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.