राजकारणात मुरब्बी असलेल्या सोपलांचे राजकीय पत्ते अद्यापही क्लोज च..वाचा सविस्तर-

कहीपे निगाहे कहीपे निशाणा…

राजकारणात मुरब्बी असलेल्या सोपलांचे राजकीय पत्ते अद्यापही क्लोज च..वाचा सविस्तर-
—–
माजी मंत्री दिलीप सोपल हे त्यांच्या हजर जबाबी व विनोद बुद्धी मुळे सर्वत्र परिचित आहेत. त्याच बरोबर वेगवेगळ्या चिन्हांवर विधानसभा निवडणूक जिंकण्याचाही त्यांचा विक्रम आहे. काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना आशा वेगवेगळ्या पक्षातून त्यांनी आज पर्यंत निवडणूक लढविल्या आहेत. त्यांनी राजकारणात जरी वेगळे मार्ग निवडले तरी ‘श’पक्ष हाच माझा पक्ष असल्याचे सांगितले होते. ‘श’पक्ष म्हणजे शरद पवार यांचे समर्थक म्हणूनही त्यांची आजही राज्यभर ओळख आहे.

मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोपल यांनी अचानक राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवबंधन हाती बांधले होते. शिवसेनेने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. सोपल यांच्या पक्ष सोडण्याने राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला होता. सोपल यांच्या या निर्णयायने नाराज असलेल्या पवार यांनी त्यांच्या विरोधात बार्शी येथे सभा ही घेतली होती. सोपल यांना शिवसेनेत गेल्याने विशेष असा काही राजकीय फायदा झाला नाही. विधानसभा निवडणुकीत पराभव तर झालाच पण त्या नंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीत ही सोपल हे फारसे सक्रिय दिसले नव्हते.

खरे सांगायचे झाले तर सोपल हे शिवसेनेत फारसे रमलेले दिसलेच नाहीत. तसेच शिवसेनेच्या राज्य पातळीवरील नेत्यांनीही सोपल यांच्या राजकीय अनुभवाचा व राज्यभर असलेल्या दांडग्या जनसंपर्काचा उपयोग करून घेतला नाही. महाविकास आघाडी स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पण कोरोना संकटातच बराचसा काळ गेला. दरम्यान अंतर्गत धुसफूस मधून एक गट वेगळा होऊन शिवसेनेचेच दोन गट पडले आहेत. महाविकास आघाडीची सत्ताही गेली. नव्याने युतीचे सरकार आले आहे.

त्यातच लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलताना सोपल यांनी कोणती शिवसेना ? मी सध्या कोणत्याही पक्षात सक्रिय नाही. सामाजिक कार्य सुरू असल्याचे सांगितले होते व त्याची बातमीही प्रसिद्ध झाली होती. त्या नंतर बार्शी येथे स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे काय असतील याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. राजकारणात मुरब्बी असलेल्या सोपल यांनी अद्याप कोणतेच पत्ते ओपन केलेले नाहीत. सोपल यांची आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत काय भूमिका असेल याचा अंदाज त्यांच्या कार्यकर्यांना ही येत नाही.

सोपलांचा ज्या प्रमाणे ‘श’ पक्ष म्हणजे शरद पवार पक्ष राहिलेला आहे त्याच प्रमाणे बार्शी तालुक्यात सोपल हाच आमचा पक्ष असे मानणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच तर सोपल यांनी आजवर विविध चिन्ह व पक्षातून निवडणूक लढवून जिकण्याचा विक्रम केलेला आहे. विधानसभा, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती अशा कोणत्याही निवडणुकीत पक्ष, चिन्ह याचा परिणाम सोपल यांच्यावर फारसा झालेला नाही हा आज पर्यंतच्या त्यांचा राजकीय इतिहास सांगतो.

सोपल यांनी मी सध्या कोणत्याही पक्षात नाही, सामाजिक कार्यात मग्न आहे असे सांगून त्यांच्यासाठी सर्वच पर्याय खुले असल्याचे दर्शवले आहे. सोपल यांनी घेतलेली भूमिका वरवर साधी वाटत असली तरी त्याचे अनेक अर्थ निघत आहेत. त्याच्या भूमिकेमुळे स्थानिक राजकारण मात्र ऐन वेळी भलतेच ढवळून निघणार आहे. सोपल सध्या कोणत्याच पक्षात नाही असा सरळ अर्थ राज्यपातळीवरील नेत्यांनी घेतला तर त्यांच्यासाठी राष्ट्रवादी, कांग्रेस या पक्षातील मार्ग मोकळा आहे. त्याचा नैसर्गिक कल राष्ट्रवादी कडे गेला तरीही स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या इतर गटांना धोबीपछाड देऊन पुन्हा जिल्ह्यातील राष्ट्रवादीची घडी बसवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे येऊ शकते.

राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नाही म्हणूनच कोणालाही शक्य न वाटणारा पर्याय म्हणजे सोपल यांच्यासाठी भाजपा चा ही मार्ग मोकळा आहे. कारण शत प्रतिशत भाजपा हे धोरण घेऊन आगामी निवडणुकांची तयारी करत असलेल्या भाजपा नेत्यांचा डोळा या वेळी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघावर असणार आहे. त्यातच लोकसभा मतदार संघात लिंगायत समाजाची असलेली निर्णायक मते याचा विचार करता या पर्यायाचा ही विचार होऊ शकतो.

सोपल यांच्या बाबतीत कोणत्याही शक्यतेचा विचार होऊ शकतो करण त्याचे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले सबंध आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीही सोपल यांचे वैयक्तिक चांगले संबंध आहेत. आता सोपल यांनी सर्व पर्याय खुले केल्याने त्यांच्याशी कोणता पक्ष संपर्क करतो आणि काय ऑफर देतो हे येणारा काळच ठरवेल. म्हणूनतर राजकारणात मुरब्बी सोपल यांच्या बाबतीत सध्या एकच म्हणावे वाटते काहीपे निगाहे काहीपे निशाणा.
——
सोपल हे कोणता निर्णय घेतील, अथवा त्यांनी काय निर्णय घ्यावा हे आम्हाला कमेंट करून कळवा, किंवा तुमच्या प्रतिक्रिया आम्हलामोबाईल no 9422650029 या what’s ap वर कळवा.
—–

ग्लोबल न्युज नेटवर्क: