आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल,फडणवीसांचे सूचक विधान

औरंगाबाद : अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजभवनावर शपथविधी पार पडला होता. या प्रसंगावरून आज सोशल मिडियावर अनेक मिम्स व्हायरल होत असून दोन्ही नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल, असे सूचक विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एका मागून एक चर्चा रंगू लागल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबादेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हे सरकार आणखी वीस वर्षे चालेले असे मुख्यमंत्री म्हणतात, या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, त्यांनी कितीही स्वप्न पाहिली तरी देखील त्यांना हे माहिती आहे की जनतेने त्यांना निवडून दिले नव्हते. हे बेईमानीने आलेले सरकार आहे. त्यामुळे ते किती काळ चालेल याबद्दल मी कुठलेही भाष्य करणार नाही. आपल्याला लक्षात येईल. मात्र, यापुढे पहाटे शपथ घेणार नाही. योग्य वेळीच शपथविधी तुम्हाला दिसेल, असे सूचक विधान करत त्यांनी अशी गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असे ते म्हणाले.

ज्या दिवशी राज्यात सरकार पडेल त्या दिवशी राज्यात दुसरे सरकार देऊ, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेविषयी देखील भाष्य करत महाविकास आघाडीतील नेत्यांवर पलटवार केला.

चंद्रकांतदादांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की, पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत.आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपला आहे. जसे शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत तसेच देशाचे पंतप्रधान देखील ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचे नेते जेव्हा पंतप्रधानांबद्दल बोलतात त्यावेळेस त्यांना काही वाटत नाही.

ज्यावेळी आपण एक बोट दाखवतो त्यावेळी चार बोटे आपल्याकडे आहेत हे या नेत्यांनी विसरू नये, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला. पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चेला देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पूर्णविराम दिला. माध्यमांना जेव्हा बातम्या नसतात तेव्हा तुम्ही पंकजा नाराज असल्याच्या बातम्या चालवता. एखाद्या बैठकीला हजेरी न लावणे म्हणजे नाराज आहे, असे होत नाही. एखाद्या वेळीस बातमी कमी पडली तर आम्ही देऊ, पण ही बातमी चालवू नका, असेही ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: