पुणे – बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात (दि.20 सप्टें) पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तर आज शनिवारी (दि.19) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून बंगाल उपसागराचा नैऋत्य भाग व उत्तर तामिळनाडूची किनारपट्टी दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर आहे. तसेच मध्य प्रदेशच्या ईशान्य भाग ते उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही स्थिती बिहार ते दक्षिण उडिसा आणि झारखंडकडे सरकत असून ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे.
सध्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान आहे. अधूनमधून ऊन पडत असले तरी सायंकाळी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भात काही प्रमाणात पावसाची उघडीप आहे.
रविवारी (दि.20) आणि सोमवारी (ता.21) कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.
दरम्यान, मंगळवारी (दि.22) राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पडेल. पुणे परिसरातही ढगाळ हवामान राहणार असून अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.