कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपन्यांना सरकारने संरक्षण द्यावे – पुनावाला
करोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या कंपन्यांना कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर कारवाहीतून सरकारने वाचवावे. यासाठी तशी कायदेशीर तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी केली आहे. लस बनवताना येणाऱ्या आव्हानांबाबत आयोजित एका व्हर्च्युअल चर्चेदरम्यान त्यांनी ही मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
यावर बोलताना अदर पुनावाला म्हणाले की, अशा प्रकारच्या समस्यांमुळे लोकांमध्ये लस घेण्याबाबत भीती वाढू शकते. याशिवाय ते लस बनवण्याच्या उद्देशाने कंपन्यांचे लक्ष विचलित करू शकतात. त्यांनी सांगितले की, त्यांची कंपनी हा प्रस्ताव सरकारसमोर ठेवण्याचा विचार करीत आहे.
कोरोनाची लस दिल्यानंतर लस घेणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारे विपरित किंवा गंभीर परिणाम झाला. तर, यासाठी लस निर्मिती कंपनीला जबाबदार धरले जाऊ नये. याकरीता सरकारने लस निर्मिती कंपन्यांवर कोणत्याही प्रकारचे कायदेशीर गुन्हे दाखल होऊ नयेत, असा कायदा करावा असे पुनावाला यांचे म्हणणे आहे.