ग्लोबल न्यूज: पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे सोमवारी पहाटे कोल्हापूरमध्ये निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.
श्रीपती खंचनाळे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते.त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयाच्या परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ते मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील होते.
श्रीपती खंचनाळे यांनी 1959 ला पंजाब केसरी बनता सिंग यांना पराभूत करून ‘हिंदकेसरी’ ची गदा मिळवली होती. ते पहिले ‘हिंदकेसरी’ ठरले होते. या विजयाने त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उंचावले होते. त्याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटात अस्मान दाखवत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला होता. त्यांनी 1958, 1962, 1965 या साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धाही जिंकल्या.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1338382087582142465?s=19
श्रीपती कंचनाळे यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांची कुस्तीतील जडण-घडण कोल्हापुरातील शाहूपुरी तालमीत झाली. त्यांनी अनेक कुस्तीपटू घडवले आहे. त्यांचे पार्थिव शाहूपुरी तालमीत अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. तिथून ते त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
कुस्ती ही लढवय्या महाराष्ट्राची शान आहे. मातीतल्या या खेळावर महाराष्ट्राचे नाव कोरले ते पहिला हिंदकेसरी किताब पटकावून श्रीपती खंचनाळे यांनी. त्यांच्या निधनामुळे अनेक हिंदकेसरींचे आणि होतकरु कुस्तीगीर पैलवानांचे वस्ताद म्हणजे मार्गदर्शक छत्र हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदकेसरी ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्राने कुस्तीला लोकाश्रय आणि राजाश्रय दिला. या कुस्तीवर महाराष्ट्राचे नाव कोरण्याची किमया ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांनी केली. देशातला पहिला हिंदकेसरी किताब पटकावून त्यांनी महाराष्ट्राचा आणि कुस्तीचा गौरव उंचावणारी कामगिरी केली. ते आयुष्यभर कुस्तीत येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहीले.
देशात पहिल्यांदा #हिंदकेसरी बनण्याचा बहुमान मिळवणारे श्रीपती खंचनाळे (वस्ताद) (८६) यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झालं.
श्री.खंचनाळे यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी झाली.
भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/bseKEm6HQX— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 14, 2020
अनेक हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांच्यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीत नाव कमावलेल्या पैलवानांचे ते वस्ताद ठरले, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. (Kolhapur wrestler First Hind Kesari Shripati Khanchnale passed away)
काळानुसार कुस्तीच्या खेळातील बदलांकडेही खंचनाळेंनी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले. त्यांना क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील आणि विशेषतः कुस्तीच्या क्षेत्रातील मार्गदर्शक असे छत्र हरपले आहे, अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या.