पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती, दुसऱ्याचे ठेवले पंतप्रधान, पण आता जन्मदाखला अडकला लालफितीत; वाचा सविस्तर

पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती, तर सोलापुरात जन्मलेल्या दुसर्‍याचे नाव पंतप्रधान; आता जन्मदाखला अडकला लालफितीत

 

उमरगा / सोलापूर : मोठ्या हौसने मुलाचे नाव पंतप्रधान ठेवले. अनेकांनी कौतुक केले. पण प्रत्यक्षात मुलाचा जन्मदाखला घेण्यास गेले असता मोठी पंचाईत आली आहे. मिळणारा जन्मदाखला हा लालफितीत अडकल्याने सरकारी कचेरीच्या पाय-या झिजवावी लागत आहेत.

 

पंतप्रधान नाव ठेवल्याने मुलाचा जन्म दाखला लालफितीत अडकून पडलाय. उमरगा तालुक्यातील चिंचोली (भु.) येथील एका दाम्पत्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवले होते. तर मागील महिनाभरापूर्वी जन्मलेल्या दुसऱ्या बाळाचे नाव पंतप्रधान ठेवले. राष्ट्रपतीला जन्म दाखला मिळाला. मात्र, पंतप्रधान हे संविधानिक पदनाम असल्याचे सांगत त्याचा जन्म दाखला लटकून ठेवण्यात आला आहे.

 

चिंचोली (भु) येथील दत्ता व कविता चौधरी या दाम्पत्याने १९ जून २०२० रोजी जन्मलेल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले होते. या नावाचा जन्म दाखलाही त्यांना मिळाला. तसे आधारकार्डही त्यांनी बनवले आहे. यानंतर १० नोव्हेंबर २०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरामणी (सोलापूर) येथे त्यांना दुसरे बाळ झाले.

या बाळाचे नाव त्यांनी बारसे घालून ‘पंतप्रधान’ असे ठेवले आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयात दत्ता चौधरी यांनी पंतप्रधान नाव ठेवलेल्या मुलाचा जन्म दाखला मिळण्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी अर्ज सादर केला. परंतु ‘पंतप्रधान’ हे संविधानिक पदनाम असल्यामुळे हे नाव बालकास द्यावे किंवा कसे? याबाबत आरोग्य केंद्राने मार्गदर्शन मिळण्यासाठी सोलापूर येथील जिल्हा निबंधक, जन्म-मृत्यू तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे १ डिसेंबर रोजी पत्र पाठवले.

 

यास आता महिना उलटून गेला तरी ना मार्गदर्शन मिळेना, ना जन्म दाखला. पंतप्रधानचे पालक दत्ता चौधरी मात्र सातत्याने आरोग्य केंद्राचे खेटे घालत असून, आता चक्क दत्ता चौधरी यांनी शुक्रवारी (दि. ११) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पंतप्रधान या नावाने जन्म दाखला देण्याची मागणी केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: