अधिकारी होण्याच्या स्वप्नाला मिळणार आकार   बिनभिंतीच्या शाळेने सुरू केले मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 

अधिकारी होण्याच्या स्वप्नाला मिळणार आकार

बिनभिंतीच्या शाळेने सुरू केले मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन

 

सोलापूर : अधिकारी होऊन प्रशासकीय सेवेत कर्तव्य बजावणे हे आजच्या तरुणाईचं स्वप्नं आहे. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी अधिकारी होण्यासाठी रात्रंदिवस करत अभ्यास करत आहेत. यासाठी हा तरुण वर्ग  मुंबई, पुणे, दिल्ली सारख्या ठिकाणी राहून महागड्या खाजगी शिकवणीचा आधार घेत यशाला गवसणी घालत आहेत. मात्र दुसरीकडे असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना पैशाअभावी खाजगी क्लास लावता येत नाही. अशा विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन सोलापुरातील बिनभिंतीच्या शाळेने मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे.

बिनभिंतीच्या शाळेत 2013 सालापासून गोरगरीब, खासगी क्लासची फी भरू न शकणाऱ्या मुलांना स्पर्धा परीक्षेचे मोफत धडे देऊन त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत हातभार लावला जात आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील पार्क चौक येथील खंदक बागमध्ये निसर्गाच्या सानिध्यात ही श‍ाळा भरते. त्यामुळे याचे नाव बिनभिंतीची शाळा असे पडले आहे. आजतागायत या बिनभिंतीच्या शाळेच्या माध्यमातून 52 विद्यार्थी शासनाच्या विविध खात्यांमध्ये सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. या शाळेचे वैशिष्ट म्हणजे मुलं खुल्या बागेत बसून गटचर्चा, संवाद या माध्यमातून अभ्यास करून यशस्वी होत आहेत.

सोलापुरातील युवक गणेश बाबुराव माने या तरुणाने  ही शाळा सुरू केली आहे. गणेश ने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत स्वत चं एम.ए, एम.एड चं शिक्षण पूर्ण केलं असून शासकीय सेवेतील
भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करत आहे. तो स्वतः रेल्वे भरतीची लेखी परीक्षेत पास झ‍ाला, पण शारीरिक पात्रतेत  अपात्र झाल्याने तो रेल्वे भरती होऊ शकला नाही. आपण आत्मसात केलेले ज्ञान इतरांना द्यावे, यासाठी त्याने ही शाळा सुरू केली. सकाळी नऊ ते दहा या वेळेत ही शाळा भरते. मात्र कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे ही शाळा सध्या बंद आहे.

गणेश सांगतो की, “शहरांमध्ये उत्तर कसबा येथे बिनभिंतीची शाळा मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालू करताना अत्यंत आनंद होत अाहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा काय आहे हे माहित नाही याची माहिती देणे, तसेच स्पर्धा परीक्षेबद्दल जनजागृती करणे, व्याख्याने, मार्गदर्शन शिबिराच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन देण्यात येणार अाहे. याशिवाय किल्ला खंदक बागेत शाळाही सुरु असणार अाहे. या महागाईच्या काळात भरमसाठ खाजगी क्लास फी वाढत आहे. गोरगरीब, वंचित, फी भरण्याची क्षमता नसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु केले अाहे.

सामाजिक कार्यातून योगदान

गणेश माने याच्या कार्याची दखल घेत विविध सामाजिक संस्थेंनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच त्याचे सामाजिक क्षेत्रातील कार्य ही अतिशय उल्लेखनीय आहे. गोरगरीब, वंचित, निराधार, अपंग या लोकांनाही सामाजिक कार्यातून मदत करत अाहे. कोरोना विषाणू संकटाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम बंद झाले होते तरीही ते न डगमगता कोरोना काळात बाहेर पडून अनेक गरजू गोरगरीब,अनाथ, बेघर, निराधार, अपंगांना मदत करत होते.

निवडक कार्य

पहिला श्रावण सोमवार निमित्त सिध्देश्वर मंदिर येथे मास्क करण्यात आले. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात अाला. एचआयवी संसर्गजन्य विद्यार्थ्यांना धान्याचे किट वाटप. स्वातंत्र्यदिनानिमित्त मोफत टॅटू काढून मास्क चे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना संस्कारशील पुस्तक श्यामची आई भेट दिली. २०० किलो तांदूळ प्रार्थना फाउंडेशन दान देण्यात अाले. १५० पुस्तक “थोर तत्व व्यक्तींचे” विद्यार्थ्यांना दिली. वृद्ध महिलांना साडी-चोळी भेट दिली. कोरोना संकट काळात आरोग्य शिबिर घेण्यात अाले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात अाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: