सावित्री नदीपात्रात सापडलेला मृतदेह पुण्यातील व्यावसायिकाचा

सावित्री नदीपात्रात सापडलेला मृतदेह पुण्यातील व्यावसायिकाचा

महाड – महाडजवळील ईसाने कांबळे गावच्या हद्दीत सावित्री नदीच्या पात्रामध्ये शनिवारी (ता. 6) सकाळी आढळलेला मृतदेह पुण्यातील पिंपरी येथील एका व्यावसायिकाचा असल्याचे निष्पन्न झाले. या व्यावसायिकाची हत्या करून त्याचा मृतदेह पुलावरून सावित्री नदीत फेकण्यात आला होता.

भोराव पुलाजवळ सावित्री नदीच्या पात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. तपासादरम्यान या मृत व्यक्तीच्या डोक्‍यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे व त्याला नदीच्या पुलावरून पात्रात फेकल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. महाड एमआयडीसी पोलिसांनी अल्पावधीतच या मृतदेहाची ओळख पटवली आहे. ही व्यक्ती पिंपरी येथील व्यावसायिक असून त्यांचे नाव आनंद उनवणे असे आहे. आनंद उनवणे हे एफएफआय चिट फंड या कंपनीचे मालक असल्याने त्यांची हत्या व्यवसायातून झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान या प्रकरणाला वेगळे वळण आले असून पिंपरी-चिंचवडमध्ये या प्रकरणी एक तक्रार दाखल झाली आहे.

अंगावर कपडे नसल्याने ओळख पटवणे कठीण होते . सुरुवातीला ती आत्महत्या असावी असा पोलिसांना वाटले मात्र नदीपात्रात तलवार सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला . मागील 4 दिवसांपासून उनवणे गायब होते. त्याबाजूने तपास चक्र वेगाने फिरली आणि हा मृतदेह उनवणे यांचा असल्याचे स्पष्ट झाले . उनवणे यांची एफ एफ आय चिटफंड नावाची कंपनी आहे . त्यामुळे उनवणे यांची हत्या व्यावसायिक वादातून झाली की यामागे अन्य कुठली कारणे आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत .

दरम्यान उनवणे यांनी पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतला असून ते सध्या लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये राहत होते. उनवणे यांचं अपहरण झाल्याचा दावा त्यांचे सहकारी करतायेत. पण दुसरीकडे पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये वेगळीच तक्रार दाखल आहे. उनवणे यांनी त्यांची मॅनेजर सुनिता हिला फोन करून त्यांच्या अकाउंटवरचे चाळीस लाख रुपये काढायला लावले, ते ड्रायव्हर मार्फत घरी पाठवण्यास सांगितले.

नंतर ड्रायव्हरला ही रक्कम गाडीच्या पुढच्या सीट खाली ठेवण्यास सांगितली, मग त्यांनी फोन बंद केला. मॅनेजर यांनी अर्ध्या तासाने परत जाऊन पाहिले असता गाडीमध्ये पैसे नव्हते. तसेच मॅनेजरने त्यांना कुठे आहात असे विचारले असता भोसरीत असल्याचे सांगितले . तिथं जाऊन पाहिलं असता, त्यांच्या घरामध्ये असलेले दागिने पण नव्हते. शनिवारी त्यांचा मृतदेह महाडच्या सावित्री पात्रात आढळला . त्यामुळे आनंद उनवणे यांचा मृतदेह इथं कसा पोहचला ? त्यांची नेमकी कोणी हत्या केली आहे ? याचा छडा पोलीस लावतायेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: