पुढच्या आठवड्यात ‘ईडी’चा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार; संजय राऊतांचा इशारा –

पुढच्या आठवड्यात ‘ईडी’चा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार; संजय राऊतांचा इशारा –

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या भाजप आणि शिवसेनेच्या राजकीय वगनाट्याचा पुढील अंक आज पाहायला मिळाला. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि विनायक राऊतांवर हल्लाबोल केला. त्यानंतर शिवसेना भवनात विनायक राऊत यांनी पत्राकर परिषद घेऊन राणेंवर प्रतिहल्ला केला. याच पत्रकार परिषदेत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अचानक एन्ट्री घेत मोठी घोषणाच केली आहे. संजय राऊत यांनी आता थेट ईडीला आव्हान दिलं आहे. पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तुम्हाला आमच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचं ते लावा. माझं स्पष्ट आव्हान आहे. आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही अशा कितीही धमक्या दिल्या तरी रिश्ते में हम आप के बाप लगते है आणि बाप काय असतो हे तुम्हाला दिसेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. आम्ही कुणाला टार्गेट करत नाही. लोकं आमच्या हातात पुरावे आणून देत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना तुम्ही खंडणीखोर बनवलं आहे. ती तुमची साधनं झाली आहेत. हे क्रिमिनल सिंडिकेट आहे. ते उघड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कुणाला अंगावर यायचं असेल तर या.

तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ. तुम्हाला तोंड काळं करून जावं लागेल. आता बंद करा हे धंदे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

ईडीच्या चौकशांची भीती घालून सर्वांच्या कुंडल्या हातात असल्याचं हे किरीट सोमय्या सांगतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याही कुंडल्या आमच्या हातात आहेत आणि आम्ही आरोप सुरू केले तर एक दिवस असा नक्कीच येणार आहे की तुम्हाला या महाराष्ट्रातून तोंड काळ करून जावं लागेल, असं राऊत म्हणाले.

ईडीचे अधिकारी कसे मोठ्या घोटाळ्यात सहभागी आहेत याची भांडाफोड लवकरच करणार आहे. पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी बसून मी ईडीचा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार आहे, असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे.

पालघरमध्ये एका गावात किरीट सोमय्यांचा एक मोठा प्रोजेक्ट सुरू असून त्याची किंमत २६० कोटी रुपये आहे. यात त्यांचा मुलगा निल सोमय्या देखील आहे आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या डायरेक्टर आहे. इतकंच नव्हे, तर ईडीचाही अधिकारी यात आहे. मग यांच्याकडे हे इतके कोटीच्या कोटी रुपये येतात कुठून?, असा सवाल करत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल यावेळी केला.

सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे रोज प्रकरणे काढणार आहोत. तुम्हाला त्याची उत्तरं द्यावं लागलतील. आणि ईडीच्या कार्यालयात आम्ही लाखो लोकं लवकर जाणार आहोत. तुम्ही आमच्या पाच पंचवीस हजाराची चौकशी करताना आम्ही तुम्हाला हजारो कोटी रुपये महाराष्ट्रातून कसे लुटले गेले?कसा भ्रष्टाचार केला? याची माहिती देतो. करा चौकशी. आता आम्ही तुम्हाला उघडं केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा झाली असता राऊत म्हणाले की आजारपण हे सांगून येत नाही. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय ठणठणीत आहेत. गेले काही दिवस ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावतानाही दिसले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत चुकीच्या चर्चा करणाऱ्यांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी करावी. त्यासोबतच, लवकरच ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचंही राऊतांनी माहिती दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: