ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा पहिला बॅनर झळकला

 

ठाणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत वेगळी भूमिका घेतल्यानंतर सर्वात आधी ठाण्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसला याठिकाणी बहुतांश पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. परंतु एकमेव ठाण्याचे खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिले. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. त्यात शिंदेंच्या बंडखोरीनंतर ठाण्यात शिवसेनेला खिंडार पडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी एकवटले.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आम्ही भाजपाशी युती केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्ववादी वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगत आहेत. त्यात आता ठाण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा पहिला बॅनर झळकला आहे. या बॅनरची सध्या शहरात चर्चा सुरू आहे. खासदार राजन विचारे यांनी हा बॅनर लावला आहे. त्यात उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा तेजोमय वारसा म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

ठाण्यातील तलावपाळी परिसरातील जांभळीनाका येथील चिंतामणी चौकात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाण्यात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लागलेला हा पहिला आणि एकमेव बॅनर आहे. ठाणे खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून हा बॅनर लावण्यात आला आहे.

या बॅनरवर हिंदुत्वाचा तेजोमय वारसा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, ठाण्याचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे, आदित्य ठाकरे, स्वर्गीय मीनाताई ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे ठाणे शहरात या बॅनरवरून चांगलीच चर्चा रंगली आहे.

भाजपचं ऑपरेशन लोटस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार

दिलासादायक | खाद्यतेल तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त, वाचा नवे दर

Team Global News Marathi: