ठाकरे शिंदे वादात कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची गोकुळमधील नियुक्ती रद्द

 

कोल्हापूर | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानतंर फुटीर गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. या दोन्ही गटांची न्यायालयीन लढा सुरु असताना आता त्याचा फटका ज्यांच्या जीवावर नेते मोठे झाले त्या निष्ठावंत शिवसैनिकांना सुद्धा बसू लागला आहे. याची प्रचिती कोल्हापूरमध्ये आली आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (गोकुळ) शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात गोकुळला आदेश प्राप्त झाला आहे. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनीही दुजोरा दिला आहे.

गोकुळमध्ये शासन नियुक्त प्रतिनिधी झाल्यानंतर मुरलीधर जाधव यांना सहज प्रवेश गोकुळमध्ये झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी आंदोलन करून हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली होती. शासन नियुक्त प्रतिनिधीला संचालक मंडळाने ठराव संमत करून सरकारकडे द्यावा लागतो. मात्र, त्यामध्ये गोकुळकडून तीन महिने दिरंगाई झाल्याने मुरलीधर जाधव यांनी आंदोलन केले होते.

त्यानंतर अलीकडेच शासन नियुक्त मुरलीधर जाधव यांच्यासह दोन स्वीकृत संचालक म्हणून युवराज पाटील व विजयसिंह मोरे यांची नियुक्ती झाली होती. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुरलीधर जाधव यांच्या पाठिशी ठाम राहिल्याने गोकुळमधील सत्ताधाऱ्यांना नमते घ्यावे लागले होते. त्यामुळेच मुरलीधर जाधव यांचा गोकुळमधील प्रवेश सुकर झाला होता. मात्र, सत्तांतर झाल्याने आता परिस्थिती बदलली आहे.

Team Global News Marathi: