“ठाकरे सरकारने संभाजीराजेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, आता केंद्राने पुढाकार घ्यावा”

कोल्हापूर | १६ जून रोजी कोल्हापूरात जे मूक आंदोलन झाले, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी मराठा समाजाच्या मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले होते. महाराष्ट्रातील प्रमुख समन्वयकांसह बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत सरकारने संभाजीराजेंच्या मागण्या मार्गी लावण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. मात्र आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय केंद्र शासनाने सोडवला पाहिजे, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. मुश्रीफ कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केलेल्या मराठा आंदोलनाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मुश्रीफ यांनी घटना दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला. “मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्र शासनाने घटनेत दुरुस्ती केली पाहिजे असे मी मूक आंदोलनावेळी म्हणालो होतो. प्रकाश आंबेडकर यांनीही केंद्र शासनाने हा विषय सोडवला पाहिजे असे म्हटले आहे.

गुरुवारी राज्य शासनाशी संभाजीराजे यांनी चर्चा केली आहे. त्यानंतर ते व अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या मागण्या मार्गी लागत असल्याचे सांगितले आहे. उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत सारथीचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठक होत आहे. यामुळे संभाजीराजेंनी राज्य शासनाकडे केलेल्या आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व मागण्या मार्गी लागत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र शासनाने सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असा पुनरुच्चार मुश्रीफ यांनी केला.

Team Global News Marathi: